Article : ‘कर्मवीर-प्रबोधनाचे कृतिशील केंद्र’ : वाचा प्राचार्या विश्रांती कदम यांचा माहितीपूर्ण लेख
प्राचार्य सौ. विश्रांती कदम
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा

पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
Pckhabar-शिक्षण महर्षी भाऊराव, भारतमातेचे थोर सुपुत्र भाऊराव, महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे पर्व भाऊराव, प्रबोधनाची धगधगती मशाल भाऊराव, उक्ती व कृती यांच्यात एकवाक्यता साधणारे भाऊराव, जीवनाच्या प्रयोगशाळेत शिक्षणाचे प्रयोग करणारे भाऊराव, माळावरती मळा फुलवणारे भाऊराव, पुणे विद्यापीठाने डी.लीट. पदवी देऊन गौरविलेले भाऊराव, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असणारे भाऊराव, कर्मवीर भाऊराव, श्रम प्रतिष्ठेचे मूल्य आजन्म जगणारे आचारवंत भाऊराव, गोरगरिबांचे कैवारी भाऊराव इत्यादी विविध नात्यांनी महाराष्ट्र ज्याना ओळखतो ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. आपल्या सर्वांचे लाडके अण्णा. आज 22 सप्टेंबर, अण्णांची जयंती. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’! या उक्तीप्रमाणे कर्मवीरांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कष्ट घेतले. आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करीत समतेचा पुरस्कार केला आणि सामान्यांच्या चंद्रमौळी झोपडीत ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. अशा या लोकोत्तर महामानवाच्या स्मृतीस प्रथमत: विनम्र अभिवादन.
काही व्यक्तींच्या विचारांची घडण वाचनातून होते. काही थोड्या व्यक्ती मात्र बहुतालच्या समाजाचे जे निरीक्षण करतात, स्वतःच्या जीवनात जे अनुभवतात, त्याच बरोबर जे ऐकतात व थोडेबहुत वाचतात या सर्वातून त्यांच्या विचारांना दिशा मिळते. कर्मवीर अण्णा हे अशा निरीक्षणातून आणि अनुभवातून शिकणाऱ्या थोड्या व्यक्तींच्या पैकी होते. कर्मवीरांचे व्यक्तिमत्व असे होते की प्राचीन ऋषीमुनींची आठवण व्हावी. भव्य देहयष्टि, छातीत रुळणारी पांढरीशुभ्र दाढी, प्रभावी व्यक्तिमत्व, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये होती. कर्मवीर ‘शिक्षण महर्षी’ होते. कर्मवीरांचे काम केवळ एक शिक्षण संस्था काढणे नव्हते तर हजारो वर्षाची समाजव्यवस्था बदलणे हे होते. समाजाच्या वेगवेगळ्या थरापर्यंत जाऊन परिवर्तनाची यंत्रणा त्यांनी उभी केली. माणसाला केंद्र करणारी, न्यायावर आधारलेली आणि समताप्रधान समाजरचना आणावी, असा कर्मवीरांचा ध्यास होता. त्यासाठी आपल्या शैक्षणिक कार्याला त्यांनी व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रबोधनाचे “कृतिशील आणि समन्वयशील केंद्र” म्हणून भाऊरावांकडे पहावे लागते. कर्मवीर अण्णा केवळ शिक्षक किंवा संघटक नव्हते, तर सामाजिक सुधारणेचे सखोल चिंतन करणारे ते एक महान तत्त्वज्ञ होते. तसं पाहिलं तर ते स्वतः काही विद्याविभूषित नव्हते. शिक्षणाचे त्यांनी वाचन किंवा अभ्यास केला होता असेही काही नाही. पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याच्या तळमळीने त्यांना एवढे भारून टाकले होते की, त्यातूनच स्वयंस्फूर्तीने त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान आणि विधायक कार्य जन्माला आले. प्री-प्रायमरी पासून पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या शिक्षणापर्यंत अण्णांनी आपला शैक्षणिक कार्यक्रम पद्धतशीरपणे आखला व त्याची पूर्तता करून दाखवली. याला थोर मुत्सद्दीपणा, चिकाटी, संघटना कौशल्य, लोकसंग्राहकवृत्ती, गुणग्राहकतत्व, राष्ट्रीय दृष्टिकोन व मानव्याची उपासना हवी असते, ती अण्णांच्याजवळ मूलतःच होती व ती त्यांनी पूर्णपणे भरून काढली.
सर्व त-हेच्या विषमतेशी झुंज द्यायची असेल तर श्रमाच्या समान धाग्याने जोपासले जाणारे समानतेचे शील अतिशय मोलाचे आहे, हे कर्मवीरांनी हेरले. म्हणूनच आपल्या संस्थेत श्रम संस्कृतीची जोपासना त्यांनी केली. सर्वांनीच काम करावयाचे म्हटल्यावर उच्च- नीचतेच्या भावनेला थाराच मिळत नसे. सर्वच व्यक्ती समान! श्रमसंस्कृतीत समानता आहे, बंधुभाव आहे, स्वावलंबन तर आहेच आहे. शील संवर्धन आहे . शीलवान असणं हा रयत शिक्षण संस्थेचा देखणा विचार आहे. जो कर्मवीर अण्णांनी दिला आहे. म्हणूनच कर्मवीर अण्णा हे आपले Spiritual Father आहेत.
कर्मवीर अण्णांनी “कमवा व शिका” ही योजना आपल्या संस्थेत सुरू करून शिक्षणपद्धतीला एक नवे वळण दिले. अंग मेहनतीचे काम करावे, त्यावर थोडासा पैसा मिळवावा आणि त्याच वेळी शिक्षण घेण्याची प्रक्रिया ही चालू ठेवावी, असे या योजनेचे स्वरूप. यामुळे श्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला .कष्ट करणारे हात आणि ज्ञान ग्रहण करणारा मेंदू जवळ जवळ आले. जो केवळ लेखन-वाचन यातच गुंतून पडतो तो ज्ञानी, ही जुनी कल्पना मोडीत निघाली. शिक्षणाचा आणि श्रमाचा असा संबंध जोडून त्यांनी शिक्षणाला जीवनाभिमुख केले. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य आहे .यामध्ये स्वावलंबन हे आर्थिक आहे, शारीरिक आहे आणि वैचारिक ही आहे.
मुलींच्या शिक्षणाबद्दल अण्णांची एक स्वतंत्र दृष्टी होती. समाजाचा सर्वांगीण विकास हा केवळ मुलांच्या शिक्षणाने होणार नाही तर मुलींनाही शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूने अण्णांनी जिजामाता अध्यापिका विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयाचा अमृतमहोत्सव आणि संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करत असताना मला या विद्यालयाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, खरोखरच ही माझ्यासाठी एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. कर्मवीर अतिशय स्वाभिमानी होते. ते सत्तेपुढे झुकले नाहीत. संपत्ती पुढे नमले नाहीत. ‘एक वेळ बापाचे नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराजांचे कॉलेजला दिलेले नाव बदलणार नाही’ असे त्यांनी एका देणगीदाराला ठणकावून बजावले होते. “मोडेन पण वाकणार नाही हे ब्रीद, जीवनात तत्वाबाबत केव्हाही तडजोड नाही, अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणे, हे सर्व करत असताना पैशामुळे आपले काम केव्हाही अडून राहणार नाही हा दुर्दम्य आशावाद” त्यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानात आपल्याला आढळतो. कर्मवीर अण्णांनी आपल्या मुलाला आप्पासाहेब पाटील यांना पत्र लिहून संस्थेवर भार बनून राहू नये. तेव्हा स्वतःसाठी अन्यत्र नोकरी बघावी, असे आग्रहपूर्वक कळविले होते. निवृत्तीचे जीवन जगत असताना आता मला चार चाकी गाडीची गरज नाही, ती परत घेऊन जावी आणि रयतच्या कामासाठी तिचा वापर करावा असे सांगितले. अशी सूचना करायला आपल्या कामावर प्रखर निष्ठा आणि त्यागी वृत्ती लागते. ती असते म्हणूनच भाऊराव पाटील ‘कर्मवीर’ होतात. मृत्यूच्या वेळी संस्थेची मालमत्ता कोट्यावधी रुपयांची होती पण भाऊरावांची खाजगी मालमत्ता शून्य रुपये होती. कर्मवीरांचा वारसा हा असा त्यागाचा आणि निस्वार्थपणाचा वारसा आहे. कर्मवीर अण्णांचे सबंध आयुष्य म्हणजे ध्येय साधनेचा एक प्रचंड यज्ञ होता. स्वतःचे खाजगी जीवन त्यांना जणू नव्हतेच. समाजाचा संसार करणाऱ्या एखाद्या योग्याचे वैराग्य त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकाशले होते. याच तपश्चर्येच्या सामर्थ्यावर ‘पद्मभूषण’ किंवा ‘डी. लीट.’ चा अत्युच्च सन्मान आपोआप त्यांच्या पायाशी येऊन पडला. कर्मवीर अण्णा ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि म्हणूनच आपण अण्णांचे कायम ऋणी राहायला हवे.
भाऊरावांची रयत शिक्षण संस्था क्रांतीनिष्ट विचारांची आणि आचारांची प्रयोगशाळाच आहे. कधीकधी असा एक विचार येतो की, कर्मवीर अण्णा जन्मालाच आले नसते तर ? किंवा रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात उभी राहिली नसती तर ? त्याचे उत्तर इतकेच की असे घडले असते तर समाजातला सामान्य माणूस शिक्षणापासून वंचित राहिला असता. महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी पाहिलेली स्वप्ने विरून गेली असती. महाराष्ट्र सामाजिक क्षेत्रात स्थिरपणे ,ठोसपणे उभा राहू शकला नसता. बहुसंख्य लोक ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ अशा वातावरणात कुचंबत राहिले असते. महात्मा फुल्यांच्या स्वप्नात कर्मवीर अण्णांनी आपल्या कर्तृत्वाने रंग भरले आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जे प्रचंड परिश्रम केले ते खरोखरच शब्दांच्या पलीकडचे आहेत. आजचा महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्टीने प्रगत झालेला दिसतो त्याचे पुष्कळसे श्रेय रयत शिक्षण संस्थेला आहे यात शंकाच नाही. म्हणूनच कर्मवीरांचे नित्य स्मरण करण्याची गरज आहे, कारण
कर्मवीरांचे स्मरण म्हणजे ज्ञानोपासनेचे स्मरण
कर्मवीरांचे स्मरण म्हणजे समतेचे स्मरण
कर्मवीरांचे स्मरण म्हणजे सामाजिक न्यायाचे स्मरण
कर्मवीरांचे स्मरण म्हणजे बहुजन कल्याणाचे स्मरण
कर्मवीर अण्णा ही क्रांतीच्या विचाराने झपाटलेली निर्मितशील शक्ती होती. म्हणूनच अण्णांना अभिप्रेत असलेली रयत शिक्षण संस्था सर्वार्थाने जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे. कोरोनानंतरच्या लढाईत महाराष्ट्राला उभारी आणण्यासाठी अण्णांनी दिलेली श्रमसंस्कृती आणि स्वावलंबनाची शिकवण आपल्याला उपयुक्त ठरेल. म्हणूनच अण्णांनी दिलेल्या श्रमाच्या मंत्राने आपण प्रेरित व्हायला पाहिजे. तशी प्रतिज्ञा आज आपण घेऊया !










Leave a Reply