Dapodi News : त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणातर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
Pckhabar- दापोडी येथील त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण संचलित बहुजन हिताय पुणे प्रकल्पाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणच्या ६६५ गरजू नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याच्या कीटचे नुकतेच वाटप करण्यात आले.
त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण संचलित बहुजन हिताय प्रकल्पाच्या माध्यमातून दापोडी येथे गेली ३० वर्षांपासून महिला व बालविकास साध्य करण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात. सध्याच्या करोनाच्या महामारीमुळे अनेक नागरिकांवर बेरोजगारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरात राहणार्या नागरिकांना अन्नधान्य टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा विचार करून त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहय्यक गणातर्फे दापोडी, फुगेवाडी,पिंपरी तसेच गोसावी वस्ती हडपसर आदी ठिकाणच्या सुमारे ६६५ गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य तसेच किराणा मालाचे वाटप करण्यात आले. तसेच २०० हून आधिक नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या उपक्रमाविषयी माहिती देताना बहुजन हिताय पुणे प्रकल्पाच्या समन्वयक मालती वानखेडे (धम्मचारी करुणादीपा) यांनी सांगितले की, महिला व बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने संघातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांना शिवण क्लास, पाळणा घर,ब्युटी पार्लर,मेहंदी क्लास आदी कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ डॉक्टरांच्याद्वारे महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. समाजातील गरजूंना मदत व्हावी या हेतूने अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या योजनेचा जवळपास ९१५ कुटुंबियांनी लाभ घेतला.










Leave a Reply