Shirur political news: भाजपच्या वाटेवरील ‘व्हायरल’ बातमीमुळे शिरूरच्या आजी-माजी खासदारांमध्ये सोशल मीडियावर जुंपली!

Shirur political news: भाजपच्या वाटेवरील ‘व्हायरल’ बातमीमुळे शिरूरच्या आजी-माजी खासदारांमध्ये सोशल मीडियावर जुंपली!

Pckhabar-शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव हे दोघेही भाजपच्या वाटेवर असलेली बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोघांनीही ती बातमी शेअर करत एकमेकांवर निशाणा साधला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी व्हायरल होत आहे. ‘राष्ट्रवादीतील चार आमदारांनी हैराण केल्याने अमोल कोल्हे मतदारसंघात फिरेना…अखेर भाजपच्या वाटेवर निघाले असे या व्हायरल बातमीत म्हटले आहे. त्यावरून खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्यावर सोशल मीडियावरून निशाणा साधला आहे. ती बातमी फेसबुकवर शेअर करत कोल्हे म्हणतात, 15 वर्षे “ मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती!
मन:पूर्वक आभार! Shivajirao Adhalrao Patil

 

दुसरीकडे, शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी व्हायरल होत आहे. बिहार निवडणुकीनंतर शिवसेनेला खिंडार, मोहन भागवत यांची नागपूरात घेतली भेट असे त्या बातमीत म्हटले आहे. त्यावरून आढळराव यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला आहे. ती व्हायरल बातमी फेसबुकवर शेअर करत आढळराव म्हणतात, ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाही अन त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा!

करमणूक अनं कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही. Dr.Amol Kolhe
माझ्याविषयी खोटी माहिती पसरवून शिरूर लोकसभेतील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही..

दरम्यान, राज्यातील सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र दोन्ही पक्ष अद्यापही एकत्र आलेले दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्यात सातत्याने कुरघोडीचे राजकारण सुरू असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *