प्रभाग समिती अध्यक्ष, विषय समित्यांची होणार निवडणूक
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बरखास्त झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल. तर, प्रभाग समिती बरखास्त होत नसल्याने अघोषित मुदतवाढ मिळालेल्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांचीही निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी हे पद मिळावे यासाठी आतापासूनच नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करू नयेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पालिकेतील विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतीक चार विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ 14 जून 2020 रोजी संपल्याने समित्या बरखास्त झाल्या होत्या. त्यांनतर कार्यकाळ संपल्यानंतर शिक्षण समिती देखील बरखास्त झाली होती. या समित्यांचे अधिकार महासभेकडे गेले होते. आता निवडणूक घेण्यास राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा उद्या आहे. त्याची विषयपत्रिका तयार झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल.
महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा वर्षाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता. प्रभाग समित्या बरखास्त होत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांचीही निवडणूक होणार आहे. दरम्यान, मागील साडेतीन वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी आता हे पद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.










Leave a Reply