दिपज्योती यादव-पवार
Pckhabar- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून जे गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे, ते थांबण्यास नाव घेत नाही. महाराष्ट्रापासून बिहार, दिल्लीपर्यंत या प्रकरणावर अनेक राजकीय पक्षाचे नेतेमंडळी तोंडसुख घेत आहेत. सुशांतच्या आत्महत्येचे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा करून घेण्यासाठी राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यामध्ये काही प्रमाणात सत्यही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अभिनेत्री कंगणा राणौतने सुशांतचा बाॅलिवुड माफीयांनी बळी घेतल्याचा आरोप करत राजकीय आणि कलाक्षेत्रात खळबळ उडवून दिली.
त्यानंतर कंगणाने मुंबईला pok म्हटले आणि मुंबई पोलिसांनाबद्दल अपशब्द वापरले. यावरून राजकारण आणखीच तापले. तर कंगणाचे मुंबईतील कार्यालयात काही बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने ते बांधकाम पाडले. यामुळे बिथरलेल्या कंगणाने बाॅलिवुड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत तोंडसुख घेतले.
त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतला. परंतु, यामुळे आणखीच चिडलेल्या कंगणाने उर्मिला यांच्यावर अश्लील टीकाटिप्पणी करत सर्व मर्यादा ओलांडली. आणि उर्मिला मातोंडकर यांना निवडणूकीचे तिकीट मिळू शकते तर मला का नाही? असा सवाल करत राजकारणात येण्याचे संकेत दिले. तर मग कंगणाला राजकारणात यायचे असेल तर हा ड्रामा कशासाठी?
कलाकारांनी राजकारणात यावे का?
मला असं वाटतं की कलाकारांनी राजकारणात यावं की येऊ नये हे सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे… पण राजकारणात येत असताना कुठल्याही पक्षाने त्यांचा फक्त वापर करून घेऊ नये किंवा कलाकाराने देखील फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी राजकारणात प्रवेश करू नये. फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी राजकारण मर्यादित नाही तर जनतेची कामे करत राजकारण करायचे असते. तर जनता आपले काहीतरी भले होईल हा विचार करून त्यांना मते देत असते. त्यामुळे आपल्याकडून जनतेचे काही भले होईल हा विचार करूनच कलाकारांनी राजकारणात प्रवेश करून स्वत : च्या फायदा न पाहता राजकारण करावे.
बॉलिवड आणि राजकारण हे नात काही नवीन नाही. आतापर्यंत महानायक अमिताभ बच्चन, गोविंदा, परेश रावल आदींनी खासदारकी भूषविली आहे. तर अभिनेत्री जया बच्चन, हेमामालिनी, नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर कितीतरी कलाकारांनी त्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी केलाच नाही असे दिसून आले आहे. ते ज्या मतदारसंघातून निवडणूक आले आहेत त्या मतदारसंघामध्ये ते नंतर फिरकतच नाहीत असे दिसून आले…(तसे तर राजकारणीही जात नाहीत) पण जनता जेव्हा या कलाकारांना निवडून देत असते, तेव्हा जनतेला या कलाकारांकडून वेगळ्या अपेक्षा असतात.
या कलाकारांना आपल्या मतदारसंघातील समस्या सोबतच त्यांच्या क्षेत्रातील देखील समस्या मांडण्याची मुभा असते. परंतु हे कलाकार जर सभागृहात उपस्थितच राहत नसतील तर राजकारणात येऊन देखील त्यांचा काहीच उपयोग नाही. या कलाकारांना ते ज्या पदावर निवडून आले आहेत त्या पदाचा सर्वतोपरी फायदा होत असतो. परंतु त्याचा वापर जर सर्वसामान्य जनतेसाठी होतच नसेल तर जनतेने कलाकारांना का निवडून द्यावे हा एक प्रश्नच आहे. फार कमी असे कलाकार आहेत की जे निवडून आले आहेत आणि त्यांना खरंच आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्याची तळमळ आहे.
बाकी समाजाची सेवा करण्यासाठी कलाकारांना राजकारणातच यावे असे काही नाही. कारण भारतातल्या प्रेक्षकांनी कलाकारांना येवढे डोक्यावर चढवून ठेवले आहे की त्या कलाकारांनी काहीही केले तरी प्रेक्षक त्यावर फारसा विचार करत नाहीत. आणि त्यांच्याकडे समाजासाठी खर्च करण्या एवढा पैसा नक्कीच असतो. त्यामुळे समाजकारणासाठी कलाकार राजकारणात येत असतील तर त्यांनी आपल्या पातळीवरच समाजकारण केलेले चांगले.










Leave a Reply