खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांचा खर्च सरकारने द्यावा -आमदार जगताप यांची मागणी

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांचा खर्च सरकारने द्यावा -आमदार जगताप यांची मागणी
Pckhabar- सरकारने कोरोना महामारीच्या काळात सर्व धर्मदाय आणि खासगी रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याची सक्ती न केल्याने आज परिस्थिती गंभीर बनली आहे. खासगी रुग्णालयांचा उपचार खर्च परवडत नसल्याने कोरोनाबाधित नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जातात. तेथे रुग्णांची संख्या मोठी असल्याने अनेकांना आयसीयू बेडसाठी वाट बघावी लागते. परिणामी वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही परिस्थिती भयावह होण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांचा खर्च सरकारने करावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
तसेच सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करण्यासाठी वारंवार पत्र पाठवूनही सरकार दरबारी दुर्लक्ष केल्याबद्दल आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री  टोपे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे सरकार जम्बो कोविड सेंटर सुरु करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु, शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले डॉक्टर्स, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, सुविधा या सर्वांचे एकत्रीकरण केल्यास कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. सरकारला वेगळे जम्बो कोविड सेंटर उभे करण्याची गरज भासणार नाही. उपचारासाठी खासगी रुग्णालये उपलब्ध झाल्यास सरकारी रुग्णालयांवर येणार ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच आयसीयू बेड मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू प्रमाणावर नियंत्रण आणणे शक्य होईल. जर सर्व खासगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येणार नसेल, तर या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांचा खर्च सरकारमार्फत करण्यात यावा. जेणेकरून कोरोनाबाधित रुग्णांवर खर्चाचा आर्थिक बोजा येणार नाही आणि वेळेत उपचार होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *