Pckhabar- यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून भाऊ-बहिणानी घरच्या घरी नोटा छापत त्या नोटा लोकल मार्केटमध्ये खपविण्याचा प्रयत्न करत होते. भोसरी येथील भाजी मंडईमध्ये या नोटा खपवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 100 रुपयाच्या 34 नोटा जप्त केल्या आहेत.
सुनिता प्रदीप रॉय (वय 22), दत्ता प्रदीप रॉय (वय 18, दोघे रा. घोटावडे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिता आणि दत्ता हे दोघेजण यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून घरातच नकली नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केला होता. 100 रुपयांच्या नोटा छापण्याचा ’उद्योग’ भावाबहिणीने सुरू केला.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भोसरी चौकीसमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये सुनीता आणि दत्ता त्यांनी छापलेल्या नकली नोटा भाजी खरेदी करण्यासाठी वापरत होते. भाजी खरेदी करून त्या नकली नोटा दोघांनी भाजी विक्रेत्याला दिल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनिता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी 100 रुपयांच्या 34 नोटा, दोन एच पी कंपनीचे प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण 34 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करीत आहेत.










Leave a Reply