पुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी जेरबंद!

पुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी जेरबंद!
 चौघांना अटक, आठ बुलेट जप्त
  Pckhabar- पुणे, हिंजवडी आणि चिंचवड परिसरातून महागड्या बुलेट  चोरी करून त्यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा येथे किरकोळ किमतीला विक्री करणार्‍या टोळीतील चार जणांना हिंजवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. इतर दोघांचा शोध सुरु आहे. आरोपींकडून आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.

सुमित सुनील सावंत (वय-19, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), प्रशांत भीमराव गायकवाड (वय 19, रा. डांगेचौक, थेरगाव), चेतन उर्फ श्रीपती शिवाजी कातपुरे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), वैजनाथ नागनाथ चौधरी (वय 22, रा. देवगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार मर्फी उर्फ आशिष भिसे आणि फान्सीस (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचा पोलीस शोध घेत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुलेट दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मारुंजी आणि हिंजवडी मधून बुलेट दुचाकी चोरून दोन चोरटे त्या बुलेट स्वतः वापरत आहेत. त्यातील एक चोरटा कोलते पाटील गेट जवळ थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुमित सावंतला हटकले. पोलिसांची चाहूल लागताच सुमित पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एक बुलेट चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. तसेच हिंजवडी, चिंचवड आणि वारजे माळवाडी परिसरातून बुलेट दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी सुमितच्या अन्य तीन साथीदारांना अटक केली.

चोरटे पुणे जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा येथे पाच ते दहा हजार रुपये किमतीला विकत होते. आरोपी फान्सीस याच्या मदतीने ही बुलेट विक्री केली जात होती. चोरट्यांनी परांडा येथील वैजनाथ चौधरी याला आणि अन्य लोकांना या बुलेट विकल्या होत्या. आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *