एकमेकास साह्य करू, अवघे धरु सुपंथ या अभंगाप्रमाणे ‘युथ क्लब’ कार्यरत !
Pckhabar- श्री संत तुकाराम महाराज यांच्या ॥ एकमेकास साह्य करू, अवघे धरु सुपंथ ॥ हा अभंग युथ क्लब,देहूगावचे ब्रीद वाक्य असून या अभंगाप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत गेल्या तीन वर्षांपासून क्लबचे सर्व सदस्य काम करत आहेत. या क्लबचा नुकताच तिसरा वर्धापन दिन विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
2017 रोजी ‘युथ क्लब देहूगाव’चा श्री गणेशा झाला. या क्लबमार्फत प्रथमच राज्य, जिल्हा, गावपातळीवर निबंध स्पर्धा घेण्यात आली. दि. 10 सप्टेंबर 2017 ते 10 सप्टेंबर 2018 या वर्षांत वाढदिवस असणार्या व्यक्तीस रोपटे भेट देण्याची संकल्पना राबविण्यात आली. वर्षभरात सुमारे 1500 ते 2000 रोपटे भेट म्हणून देण्यात आले. दरवर्षी दिवाळीत देहूतील ग्रंथालयांस पुस्तके देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. तसेच श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात येते.
पर्यावरण या विषयावर क्लबच्या सदस्यांनी काम केले. या अंतर्गत देहूतील काही भागातील कचर्याचे ढिग उचलले. वर्षभरात वेगवेगळ्या विषयांवरील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले जाते. आपत्तीमध्ये क्लबच्या सदस्यांनी खारीचा वाटा म्हणून गतवर्षी कोल्हापूर पुरामधील अडकलेल्या नागरिकांना एक पीकअप भ़रून जीवनावश्यक वस्तू पाठविल्या होत्या.
2018-2019 हे वर्ष वैचारिक राबविण्याचा संकल्प सदस्यांनी केला होता. त्यानुसार वाढदिवस असणार्या व्यक्तीस पुस्तक भेट देण्यात येत होते. तर 2019-2020 या वर्षात क्लबने ’स्वच्छ माझे गांव’ मोहिमेअंतर्गत देहूतील घाटांवर लक्ष केंद्रित केले आणि ते स्वच्छ व सुशोभित करण्याचा काम हाती घेतले. सुशोभिकरणाचे काम कोविड संकटामुळे रखडले आहे. सध्या क्लबच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने वैचारिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
देहूगाव क्लबला नुकतेच साकोरे शाळेकडून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नगरच्या स्नेहालय संस्थेनेही सन्मानित केले आहे.










Leave a Reply