‘आचार रसायन’

‘आचार रसायन’
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)

Pckhabar- ‘आचार रसायन’
वाचून आश्चर्य वाटले असेल, हे काय? आयुर्वेदाच्या आठ अंगापैकी रसायन-वय:स्थापन हे एक अंग आहे. जे उपाय वृद्धत्व व आजार यांना दूर ठेवण्यास सहाय्यक होतात त्या उपायांना “रसायन” असे म्हणतात.

रसायनामुळे सामान्यतः पुढील लाभ होतात- निरोगी दीर्घायुष्याची प्राप्ती, स्मृती-बुद्धीत सुधारणा होणे, ज्ञानेंद्रिये-कर्मेंद्रिये यांचे बल वाढणे, दीर्घकाल तरुण्यावस्था कायम राहणे, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढणे इ.अनेक लाभ होतात.

रसायन सेवनाचे काही नियम व प्रकार आहेत. त्यापैकी “आचार रसायन”हा एक प्रकार आहे. सध्याच्या कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती हा एक परवलीचा शब्द बनला आहे. सर्वांचीच एक समजूत झाली आहे की, चांगले-पौष्टीक खाल्ले की रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, वाढते. रोगप्रतिकारक शक्ती केवळ यावरच अवलंबून नसते तर ती चांगल्या आचार, विचारांवर तितकीच अवलंबून असते. म्हणूनच आचार रसायनाचे महत्त्व अबाधित आहे. रसायन औषधाने जे लाभ होतात, तेच लाभ चांगल्या वागण्याने, चांगल्या विचाराने होतात. त्यालाच “आचार रसायन” असे म्हणतात. कधी ही नव्हते इतके महत्त्व सध्याच्या काळात आचार रसायनाचे आहे. आचार रसायनाने मनाचा विकास होतो, मनोबल वाढते, मान-सन्मान मिळण्यात मदत होते, बोलले खरे करण्याची इच्छा निर्माण होते. शरीर व मन ही एकमेकांवर अवलंबून असतात. परिणामी मनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली की शरीराची ही वाढते.

आचार रसायनाने मनाचा सात्विक गुण वाढतो तर मनाचे रज व तम् हे जे दोष आहेत ते कमी होतात. मनात सात्विक गुण जितक्या प्रमाणात वाढेल, तितक्याच प्रमाणात त्याचा शरीर व मनावर परिणाम होतो. सध्याच्या एकूणच सर्व वातावरणात अनेक गैरकृत्यांमुळे (भ्रष्टाचार, बलात्कार, मादक पदार्थांचा व्यापार, मीडियाचा वापर करून बेफाम आरोप करणे इ. यासारखी अनेक कृत्ये) मनाचे रज व तम् हे गुण अधिक वाढलेले दिसून येतात. हे वाढते दोष स्वतःसाठी व समाजासाठी ही घातक आहेत. आज जे सर्व प्रकारचे मानसिक आजार वाढले आहेत ते वाढण्याला कारणीभूत आहेत ते वाढलेले रज व तम् हे मनाचे दोष. आचार रसायानाचे पालन करणे हे स्वतः समाज, राज्य, देश या सर्वांसाठीच आवश्यक आहे.

काही आचार, विचार पुढील प्रमाणे-
सतत सत्य बोलावे, काम-क्रोध-मद- मत्सर-लोभ-भय यांना दूर ठेवावे, कायिक-वाचिक व मनाने अहिंसक असावे, नेहमी प्रिय बोलावे, झोप व जागरण यात तारतम्य बाळगावे, आपल्या योग्यतेनुसार चांगल्या-गरीब व्यक्तीस-संस्थेस मदत करावी, इंद्रियांवर योग्य प्रमाणात ताबा मिळवावा, कोणत्याही जाती-धर्माची निंदा न करता त्या धर्माच्या अनुयायांशी प्रेमाने वागावे, जे बोलायचे ते योग्यवेळी-पाल्हाळ न लावता सत्य व मनाला पटणारे असेल तरच ते दुसऱ्याला सांगावे. शिक येत असता-ढेकर येत असता-खोकला येत असता शरीर वेडेवाकडे करू नये, शिंक आली असता-हसताना-जांभई देताना तोंड हातांनी किंवा रुमालाने झाकून घ्यावे, कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाणे इ.
दररोज रात्री झोपताना मी आज काय केले? माझा आजचा आचार व विचार कसा होता? याचा विचार-मनन करावे.

आज समाजात अनेक लोक धर्मकार्य, देवपूजा करतात व वागताना विरुद्ध वागतात, आपला स्वार्थ कसा साधेल, दुसऱ्याचे कसे नुकसान होईल हे पाहतात हे सर्वत्र दिसून येते. अशा लोकांना देव कधी पावत नाही. संत तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे, “भाव तेथेचि देव”.मनात श्रध्दा, दुसऱ्याचे चांगले करण्याचे विचार हवेत. सकारात्मक विचारांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर नकारात्मक विचारांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते,हे सिद्ध ही झाले आहे. म्हणूनच चांगल्या विचारांनी, चांगल्या आचारांनी रसायन औषधांशिवाय “आचार रसायनाने” मिळणाऱ्या नैतिकते ने मन व शरीराला सर्व प्रकारचे बल मिळून, रोगप्रतिकारक शक्ती वाढून निरोगी दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *