अजब कारभार ! मृत्यूनंतर प्रशासन म्हणतंय रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, रुग्णाला घ्यायला येऊ का?

अजब कारभार ! मृत्यूनंतर प्रशासन म्हणतंय रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, रुग्णाला घ्यायला येऊ का?
Pckhabar- कोरोना महामारीत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे. पालिका प्रशासन अक्षरशः रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. एका ज्येष्ठ महिलेचा पालिका रूग्णालयातच मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतर प्रशासनाने महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून रूग्णाला घ्यायला येऊ का? असे विचारल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रुपीनगर तळवडे येथे वास्तव्यास असलेल्या कमल पांडुरंग धुकटे (वय 59) यांनी  1 सप्टेंबर रोजी महापालिकेच्या यमुनानगर येथील रुग्णालयात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली. अँटीजेनचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडले. दहा दिवसांनंतरही आरटीपीसीआरचा रिपोर्ट आला नाही. त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी (दि. 9) वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. तरी देखील त्यांचे रिपोर्ट आले नव्हते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह की पॉझिटिव्ह माहिती नसताना उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 11) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती कमल पांडुरंग धुकटे यांचा मुलगा स्वप्नील धुपटे यांनी दिली.
कोरोना रिपोर्ट यायच्या आधीच रुग्णाचा मृत्यू झाला असताना  प्रशासनाने आज शनिवारी रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करत तुमचा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णवाहिका घेऊन रुग्णाला घ्यायला येऊ का अशी विचारणा करत कहर केला आहे.
 शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ असून रूग्णसंख्या 60 हजारच्या पुढे गेली आहे. तर 1 हजार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांना पाच-पाच दिवस रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे देखील सांगितले जात नाही. रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे हे माहिती होत नाही. रुग्ण घरीच राहिल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत.
कोरोनाचे रिपोर्ट दहा दिवसानंतरही आले नव्हते. आईचा काल मृत्यू झाला. त्यानंतर 24 तासाने रिपोर्ट आले आहेत. काल मृत्यू झाला असताना आज पालिका प्रशासनाकडून फोन आला की तुमच्या आईचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना घ्यायला येऊ का? किती हलगर्जीपणा केला जात आहे. मृत्यू झाल्यानंतर रिपोर्ट येत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा संताप कमल यांचा मुलगा स्वप्नील धुपटे यांनी व्यक्त केला. तसेच वडिलांचे वय जास्त आहे. त्यांचा रिपोर्ट देखील आजूनही आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत.  कोणाचा कोणाला पायपोस नाही. ढिसाळ कारभार सुरू आहे. सत्ताधार्‍यांचे लक्ष केवळ खरेदीवर आहे.  पिंपरी-चिंचवडकर राम भरोसे झाले आहेत की काय असा प्रश्न पडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर म्हणाले. योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्या, मृत्यू वाढत आहेत. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *