देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्ध्वस्त केले- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
Pckhabar- मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतो, म्हणून मला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. मला उद्ध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. आमचे मुख्यमंत्री फडणवीस ड्राय क्लिनर होते. आरोप झालेल्या प्रत्येकाला त्यांनी क्लीन चिट दिली. पण नाथाभाऊला मात्र त्यांनी क्लीन चीट दिली नाही, असेही खडसे म्हणाले.
जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
नाथाभाऊ पक्ष का सोडत नाही, असे कार्यकर्ते विचारतात. नाथाभाऊने काही काळबेरं केलं म्हणून नाथाभाऊ पक्ष सोडत नाही का, असं काहीही नसून अनेक पक्षातून आजही ऑफर आहे. महाराष्ट्रातील जनतेला विचारून लवकरच निर्णय घेईल, असा थेट इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे.
मला जो त्रास झाला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो. मला उद्ध्वस्त करण्याचे काम केले. मला पक्षाचा कधी विरोध झाला नाही तर व्यक्तीने केला. माझी ताकद माझा कार्यकर्ता, माझी जनता, असे सांगत नव्या वाटचालीबाबत सांगताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.










Leave a Reply