विद्युत रोहित्राच्या स्फोट प्रकरणी महावितरणच्या अधिकार्यांवर गुन्हा
Pckhabar- विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन उकळते ऑइल दोन महिला आणि एका चार महिन्यांच्या बाळाच्या अंगावर सांडले. यामध्ये दोन महिलांचा आणि बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी न घेतल्याबाबत तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महावितरणच्या संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे अधिकारी सुनील रोटे आणि अन्य संबंधित अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप भगवान कोतवाल (वय 59, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवन्या काकडे (वय 4 महिने), हर्षदा सचिन काकडे (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोतवाल यांच्या घराजवळ असलेला विद्युत रोहित्र नादुरुस्त होता. त्याबाबत कोतवाल यांनी महावितरणच्या कर्मचारी-अधिकार्यांना सांगितले होते. वारंवार सांगून देखील महावितरणकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.
दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता विद्युत रोहित्राचा बिघाड झाला. महावितरणच्या लोकांनी तो विद्युत रोहित्र काढून दुसरा विद्युत रोहित्र बसवले. मात्र ते देखील नादुरुस्त होते. त्याचा स्फोट झाला आणि त्यातून उकळते ऑइल बाहेर पडले. ते उकळते ऑइल मयत महिलांच्या अंगावर पडले. यात चार महिन्यांच्या चिमुरडीचा देखील समावेश आहे.
याबाबत महावितरणच्या संबंधित जबाबदार अधिकार्यांवर भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
विद्युत रोहित्राच्या स्फोट प्रकरणी महावितरणच्या अधिकार्यांवर गुन्हा










Leave a Reply