मावळातील दुग्ध व्यावसायिकांना ’अच्छे दिन’

मावळातील दुग्ध व्यावसायिकांना ’अच्छे दिन’
Pckhabar- दमदार मान्सूनच्या पावसाने भरपूर पाणी आणि मुबलक चारा यामुळे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आल्याने दुग्ध व्यवसायिकमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.  
        यावर्षी मावळ तालुक्यातील  सर्व विभागात मान्सूनचा पाऊस अतिशय चांगला झालेला असून या पावसाने तालुक्यातील सर्व धरणे, छोटे तलाव, नद्या, ओढे, विहिरी यांना मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. सर्व धरणे शंभर टक्के भरल्याने जादा विसर्ग म्हणून धरणातून पाणी सोडून देण्यात आलेले आहे.
    चांगल्या पावसामुळे डोंगर-दर्‍या ,पठारीभाग तसेच गवतीचारा, राने, कुरणे  यातील गवताची चांगली वाढ होत आहे. त्यामुळे जनावरांचा गवती चारा मुबलक प्रमाणात वाढत असल्याने चार्‍याचा प्रश्न निकालात निघालेला आहे. मुबलक चारा उपलब्ध झाल्याने दुभत्या गाई, म्हशीच्या दुधाच्या उतार्‍यामध्ये चांगल्या प्रमाणात नैसर्गिक वाढ झाल्याने दूध उत्पादन वाढले आहे.
 मावळ तालुक्यात सुमारे 15 हजार दुभत्या गाई आणि 25 हजार म्हशी असून एकूण जनावरांची संख्या 60 हजार आहे. यावर्षी चांगला चारा आणि पाणी उपलब्ध झाल्याने जनावरांची प्रकृती नैसर्गिक रीतीने सशक्त झालेली आहे. मावळ तालुक्यात एकूण 10 हजार दूध उत्पादक शेतकरी असून त्यांच्याकडून दोन लाख लिटर पर्यंत उत्पादन केले जाते. तर दररोज एक लाख लिटरपेक्षा जास्त दूध पुणे ,मुंबई, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, देहूरोड, लोणावळा या स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येते असे प्रमुख दूध उत्पादक व्यवसायिक मनोज ढमाले यांनी सांगितले.
 मावळ तालुक्यात कात्रज दूध डेअरी, अमोल दूध डेअरी, ढमाले  दूध डेअरी, मावळ टाटा डेअरी याशिवाय स्थानिक दूध व्यवसायिक दूध संकलन करीत आहे. सध्याच्या नैसर्गिक वातावरणामुळे दूध उत्पादनामध्ये चांगली वाढ झाल्याने दूध व्यावसायिकांना त्यामुळे चांगल्या प्रकारे आर्थिक मदत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *