दोष कोणत्या यंत्रणेचा?: ॲड. संजय माने
Pckhabar- कोरोना प्रतिबंध लस निर्मितीचे संशोधन करण्यात ज्या शहराचे एक पाऊल पुढे आहे. त्या पुणे शहरात पांडुरंग रायकर या उमद्या पत्रकाराला वेळीच योग्य उपचार मिळू न शकल्याने जीव गमवावा लागला. मनाला चटका लावणारी वेदनादायी अशी ही घटना आहे. व्यवस्थेने या पत्रकाराचा बळी घेतला, अशी ओरड सुरू आहे. व्यवस्था नेमकी कोणती? केवळ सरकारी यंत्रणेला, खाजगी आरोग्य यंत्रणेला दोष देऊन उपयोग नाही. पत्रकारांसाठी कार्य करणारी यंत्रणा, ज्यांच्यासाठी पत्रकार जीवाचे रान करतात, ते नेमके पत्रकारांना मदत करण्याची वेळ येते, तेव्हा कसे वागतात, काय कृती करतात? हेसुद्धा यानिमित्ताने तपासावे लागणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, गेल्या 4 महिन्यात पत्रकार बांधवांना अनेक संकटाशी सामना करावा लागला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची सर्वजण दक्षता घेत होते, आजही घेत आहेत, लॉक डाउन चे कडक निर्बंध असल्याने, बाहेर वावरणे कठीण झाले असताना, पत्रकारांना बातम्या संकलनासाठी बाहेर पडावेच लागत आहे. कोविड सेंटरला भेट देऊन वेळोवेळी कोरोना रूग्ण, रुग्णालयातील स्थिती, उपाययोजना याची माहिती जीव धोक्यात घालून बातमी स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आहेत.
कोरोनाच्या काळात कामगार कपातीच्या धोरणात अनेक पत्रकार बंधू, भगिनींना बेरोजगार व्हावे लागले आहे. राजकीय पुढारी, नेते मंडळी, उद्योजक यांच्याकडून मिळवलेली जीवनावश्यक वस्तूंची गरजू पत्रकारांना किट वाटप करण्यात आली. संकटात सापडलेल्या पत्रकारांच्या नोकऱ्या वाचविण्याचे कोणतेच प्रयत्न मात्र या काळात झाले नाहीत. पत्रकारांच्या वेतन कपातीबाबत कोणी आवाज उठविला नाही. कोरोनापासून रक्षण व्हावे, याची खबरदारी म्हणून ज्यांनी पत्रकारांना आवश्यक ती सुरक्षा साधने देणे अपेक्षित होते, त्यांनी अशी साधने पुरवली नाहीत. उलट या काळात जाहिराती मिळविण्यासाठी पत्रकारांनी बाहेर पडावे, असा त्यांच्यामागे तगादा लावला होता. पत्रकारांच्या जीवाची कोणालाच काही पर्वा नाही,हे विविध पातळ्यांवर आता सिद्ध झाले आहे. लॉकडाऊन मध्ये बातमी संकलनासाठी गेलेल्या काहींना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला आहे. अनेकांना कोरोना संसर्गाची बाधा झाली.
जगभरातील बातम्या देण्यात आघाडीवर असल्याची बतावणी करणारेही आपल्या पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली, याची बाहेर कोठेही वाच्यता होणार नाही,याबद्दल काटेकोर दक्षता घेत असल्याची माध्यमकर्मीमध्ये चर्चा आहे.
पत्रकारांना मास्क कोणीतरी द्यावेत, संस्था, पुढारी यांनी गरजू पत्रकारांना अन्नधान्य किट द्यावीत, कोरोनाने मृत्यू झाल्यास सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जाते. पत्रकारांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या यंत्रणांचे नेमके काम काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रोजची वाहनांची प्रचंड वर्दळ, नागरिकांची गर्दी यातून रस्ता काढत ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुण्यातून काही तासात हजारो किलोमीटर अंतरावर प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव विनाअडथळा नेले जातात. त्याच्या मोठ्या वातम्यांही प्रकाशित होतात. पुण्यासारख्या शहरात वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज असूनही पत्रकाराला तातडीक वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही. उपचार मिळू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे.
डॉक्टर तसेच रुग्ण सेवा देणारे कर्मचारी, पोलीस यांना कोरोना योद्धा संबोधून शासनाने त्यांना विमा कवच घोषित केले. पत्रकारांचीही कोरोना योद्धा म्हणून गणना करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पत्रकारांना 50 लाख विमा संरक्षण मिळू शकते, हे शासनाने जाहीर केले असताना, शासनाची ही आर्थिक मदत पत्रकारांच्या वारसांना का मिळू शकत नाही? पत्रकारिता म्हणचे लोकाभिमुख चळवळ असे म्हणत, आम्ही अमक्याला मदत मिळवून दिली, आमच्या बातमीमुळेच सरकारला झुकावे लागले. असे ऊर बडवून सांगत खोटे श्रेय मिळविण्यासाठी धडपडणारे, पत्रकारांना आपल्याच सहकाऱ्यांना, परिवारातातील सदस्यांना न्याय मिळवून देण्यात कमी का पडताहेत. आपल्या बांधवाना शासनाची मदत मिळण्यास नेमक्या काय अडचणी आहेत, याचे उत्तर पत्रकारांसाठी कार्यरत असलेली यंत्रणा देणार का?
पत्रकारांसाठीची ही कुचकामी यंत्रणाच खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या या बिकट परिस्थितीला जबाबदार आहे. त्यामुळे कोणत्या दुसऱ्या व्यवस्थेला जबाबदार धरण्यापेक्षा, दोषी ठरविण्यापेक्षा आम्ही आमच्यासाठी काय करतो. याचे आत्मपरीक्षण केले तरच खरे उत्तर मिळणार आहे.










Leave a Reply