माजी राष्ट्रपती, ‘भारतरत्न’ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

शिक्षक दिनानिमित्त प्राचार्या विश्रांती कदम यांचा खास लेख
सौ. विश्रांती जयसिंग कदम
प्राचार्य, (जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा)
Pckhabar- 5 सप्टेंबर, भारताच्या राष्ट्रपतीला जन्म देण्याचे भाग्य या दिवसाला जसे लाभले तसेच एक ”आदर्श भारतीय शिक्षक” या दिवशी जन्मले, हे देखील सौभाग्य या दिवसाला लाभले, म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस आम्हां शिक्षकांचा सन्मानाचा दिवस आहे. ज्या ज्या शिक्षण तज्ञांनी आपले योगदान दिले आहे, त्या सर्वांना स्मरून त्यांची तत्वे, मूल्ये आचरणात आणण्याचा, त्याविषयी चिंतन व आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. अशावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा दिल्याशिवाय शिक्षक दिन पूर्णच होऊ शकत नाही. एक महात्मा फुले की ज्यांनी एका सावित्रीला शिकवलं आणि तिने अनेक ज्ञानज्योती या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केल्या.
सावित्रीबाई या खंडोजी पाटलांच्या जेष्ठ कन्या. “पहिली बेटी धनाची पेटी “किंवा ‘पहिली बेटी तूप रोटी’ या म्हणीप्रमाणे आम्हा तमाम स्त्रियांना सावित्रीबाईंनी धनाची पेटी दाखवून तुपाची रोटी खाऊ घातली आणि याच सावित्रीने आपल्या असामान्य कर्तृत्वाने कोहिनूर हिऱ्यालाही लाजवेल अशी झळाळी देऊन तमाम स्त्री वर्गाला शैक्षणिक तेजाने उजळून टाकले. आपले आयुष्य पणाला लागले असताना देखील जीवनात हार वा अपयश न मानता आपण घेतलेले कार्य प्रयत्नपूर्वक व सातत्याने त्या करत राहिल्या. त्यांच्या अंगात खूप मोठे साहस, धाडस, धैर्य व सहनशीलता होती. किमान आजच्या दिवशी एवढे गुण जरी समस्त स्त्री वर्गाने घेतले तर शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचं सार्थक होईल असे मला वाटते.
विद्यार्थ्यांचे यश हेच खऱ्या अर्थाने शिक्षकांचे यश अशी यशाची व्याख्या करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ. ए .पी .जे. अब्दुल कलाम. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे गुणवंत शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी शिक्षकांना शपथ दिली होती की first & foremost I will love teaching.Teaching will be my soul. शिक्षकांनी स्वतःला महान केव्हा समजावे या संदर्भात त्याच कार्यक्रमात त्यानी सांगितले होते, “जेव्हा मी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्येही सर्वोच्च कामगिरी करण्याची क्षमता निर्माण करेन तेव्हाच मी स्वतःला महान समजेन”. याचाच अर्थ असा की, सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षकाकडून कधीही दुर्लक्षित होता कामा नये. शिक्षकांनी आपले आचरण, आपले जीवन असे ठेवावे की तो त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी संदेश असेल म्हणजे मग विद्यार्थ्यांना बाहेर ‘आदर्श’ शोधायलाच नको. असे आचरण संपन्न आदर्श शिक्षक प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसमोर असतील तर शिक्षण क्षेत्राची वाटचाल शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने झाल्याशिवाय राहणार नाही.
जो, जो जयाचा घेतला गुण |
तो, तो म्या गुरु केला जाण |
गुरुसी आले अपार पण |
जग संपूर्ण गुरु दिसे ||
असे संत एकनाथ महाराजांनी जे सांगून ठेवले ते सूर्यप्रकाशाइतके लखलखीत सत्य आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकण्याची प्रक्रिया सुरूच असते. आपण विद्यार्थीच आहोत हे ज्याला उमगत, समजतं, अशीच माणसे मोठी होतात. ज्ञान मिळवण्याचा त्यांचा ध्यास कधीच कमी होत नाही आणि कधी संपतही नाही, म्हणूनच एकीकडे आसाम मधील ‘भोलाराम दास ‘हे वयाच्या शंभराव्या वर्षी पीएचडी संशोधनासाठी नोंदणी करतात तर दुसरीकडे राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर दुसऱ्याच दिवशी डॉ. ए .पी .जे. अब्दुल कलाम चेन्नई विद्यापीठातल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जातात. वयाची ऐंशी वर्षे उलटल्यावरही मला अजूनही खूप शिकायचं आहे असे ते विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत असत. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्नेही सृजनपाल सिंह यांनी कलाम यांना विचारले की, कलाम साहेब लोकांनी तुम्हाला लेखक, शास्त्रज्ञ ,मिसाईल मॅन की राष्ट्रपती म्हणून लक्षात ठेवावे. यावर कलाम म्हणाले, लोकांनी मला एक शिक्षक म्हणून लक्षात ठेवावे. यावरून मला वाटले की, यातच आम्हा सर्व शिक्षकांचा सन्मान सामावलेला आहे.
असेच दुसरे एक विद्यार्थी डॉ. आईन्स्टाईन, भौतिकशास्त्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ. वयाच्या सत्तरी नंतरही ते इंग्लंडमधल्या केंब्रिज विद्यापीठाच्या ग्रंथालयात नियमितपणे अभ्यासासाठी जात असत. एकदा ग्रंथालयातील अभ्यास संपून घरी जाण्यासाठी ते बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. तिथेच एक तरुण उभा होता. त्याने आईन्स्टाईन यांना विचारलं तुम्ही काय करता ? विद्यापीठात कशासाठी आला होता? ते म्हणाले मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्या अभ्यासासाठी विद्यापीठात येतो. डॉ. आईन्स्टाईन यांनी त्या युवकाला विचारलं, तुम्ही काय करता? तो म्हणाला, मी या विद्यापीठात प्रोफेसर आहे. फक्त पदवीचा अहंकार चढलेल्या त्या युवकाला आपण ज्यांच्याशी बोलतो ते जगातले ख्यातनाम भौतिक शास्त्रज्ञ आहेत हे माहिती नव्हतं. खरंतर, वयाच्या तिशी पर्यंत शिकल, म्हणजे खूप झालं ,असं बहुतेक लोकांना वाटतं. पण ज्ञान मिळवण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हेच खरं .अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या काही विद्वानांना मात्र आपल्या पांडित्याचा, विद्वत्तेचा अहंकार असतो पण अशी मोठी माणसं आपल्या पांडित्याचं प्रदर्शन कधीच करत नाहीत.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने यासारखे आदर्श आपण नक्कीच घ्यायला हवेत. शिक्षक दिन साजरा करतानाही आपण याच विचारांचे पाईक होण्याचा प्रयत्न केला तर उद्याचे भवितव्य उज्वल असेल यात अजिबात शंका नाही.










Leave a Reply