डॉ. अनिल रॉय, सुनील बेळगावकर, सुनील लोंढे यांना आयुक्तांचा दणका
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नोंदणीकृत ठेकेदाराकडून थेट बँक खात्यावर पैशे घेणारे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर आणि बायोमेडिकल इंजिनिअर सुनील लोंढे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. तिघांच्या या कृतीमुळे पालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.
रॉय यांचे आर्थिक अधिकार काढले. रॉय यांनी मुलाच्या आणि बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवसायाबाबत पालिकेला कळविणे आवश्यक असतानाही हेतुपुरस्सर कळविले नाही. त्यामुळे रॉय यांच्या मुलाचा आणि बेळगावकर यांच्या पत्नीचा व्यवसाय अडचणीत आला आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते.
श्री कॅन्सट्रक्शन यांच्या जमा खर्चच्या छायांकित प्रतीमध्ये सन 2017-18 टॅक्स ऑडीट रिपोर्ट मधील प्रतमध्ये मालमत्ता म्हणून लोन ऍडव्हान्स या शिर्षखाली डॉ. रॉय यांचे नावे दोन लाख, बेळगावकर 80 हजार आणि लोंढे यांच्या नावावर दोन लाख 43 हजार 208 रुपये घेतल्याची नोंद आढळून आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 ऑगस्ट 2020 रोजी द्विसदस्यीय समिती नेमली होती. समितीने 7 ऑगस्ट रोजी आयुक्तांना आपला अहवाल सादर केला. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम मधील नियम 4 (1 अ) मधील तरतुदीनुसार डॉ. रॉय, बेळगावकर, लोंढे यांनी आर्थिक व्यवहार करताना नियमांचा भंग करून रक्कम स्वीकारली आहे. ही बाब पालिकेस कळविणे आवश्यक असतानाही कळविली नाही.
नेमून दिलेल्या कर्तव्यात सचोटी न राखता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डॉ. रॉय, बेळगावकर, लोंढे यांनी पदाचा गैरवापर केला आहे. यामुळे पालिकेच्या विश्वासाला तडा गेला असून प्रतिमा मलिन होत आहे. तिघांची सचोटी संशयास्पद आहे. त्यामुळे तिघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.










Leave a Reply