कर्ज मंजूर व्हावे म्हणून आमदाराने धुतले चक्क बॅक मॅनेजरचे पाय!
Pckhabar- शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं कर्ज बँकेकडून मंजूर केलं जात नसल्यामुळे हे कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुतले आणि या बँक मॅनेजरवर फुलेही उधळत पायाही पडले. धस यांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सुरेश धस यांनी पीक कर्जाबाबतचं भयाण आणि धक्कादायक वास्तव मांडलं आहे. पीकं बाजारात जाण्याची वेळ आली तरी शेतकर्यांना पीक कर्ज अद्याप मिळालेलं नाही. बँकांच्या मनमानी कारभारामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण गावात देखील पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जा उडालेला आहे. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकांना वारंवार भेटून विनंती करून देखील पीककर्ज वाटप यंत्रणेत काहीच बदल होत नव्हता. बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकऱ्यांची सतराशे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नव्हती. शेवटी धस यांनी बुधवारी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत बँक शाखा व्यवस्थापकांचे पाय धुवून, फुले वाहून आहेर करत शेतकऱ्यांची पीक कर्ज मंजूर करण्याची विनंती केली, असे सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
सुरेश धस यांनी बँक मॅनेजरला त्यांच्या घरी बोलावले. या मॅनेजरला खुर्चीत बसवून त्यांना पाटावर पाय ठेवायला लावले. त्यानंतर पाण्याने त्यांचे पाय धुतले. टिश्यू पेपरने बँक मॅनेजरचे पाय पुसल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले टाकून त्यांच्या पायावरही फुले ठेवली. त्यांच्या पायाही पडले.










Leave a Reply