बाप्पा तुझं विसर्जन…!

बाप्पा तुझं विसर्जन…!
सौ.अश्विनी दिपक आडकर
(लेखिका- संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूगाव येथे उपशिक्षिका आहेत.)

Pckhabar- दहा दिवसांचा पाहुणा म्हणुन आलेला गणराय त्याच्या घरी गेला..पाहता पाहता दहा दिवस कधी संपले कळालंच नाही. बाप्पाचे विसर्जन जणु काही आपली खुप जवळची व्यक्ती आपल्यापासुन दुर जाताना जेवढी हुरहुर वाटते अगदी तशीच हुरहुर वाटत होती!घरात बाप्पा होता, त्या कोपर्‍याकडे पाहुन कससच होत.

दहा दिवसांच्या या वास्तव्यात त्यानं काय काय शिकवल??नेहमी कामात असणारी मोठी माणसं मुलात मुल होऊन आरास करण्यात रमली, एरव्ही वेळ नाही अस म्हणणार्‍या आम्ही नोकरदार गृहिणी अगदी उत्साहाने , आनंदाने पुजा अर्चा , फराळाचे पदार्थ करण्यात रमलो,घरातली वडिलधारी माणसे हे भरलं गोकुळ पाहण्यात रमली!!!

खरच हा सण एकोप्याचा संदेश देतो तो असा! पण या वर्षीच्या या उत्सवाला कोरोनाचं गालबोट होतं. तरीही आपण social distancing पाळत घरच्या घरी बाप्पांचा उत्सव साजरा केलाच. विसर्जन करत असताना सहजच विचार आला ,की हे असंच विसर्जन आपण आणखी काही गोष्टींच केल पाहीजे हो! विसर्जन केलं पाहिजे आपल्या अहंकाराचं ! अहंकार- ज्याच्यामुळे माणूस माणसाला दुरावतो. विसर्जन केलं पाहिजे स्वार्थीपणाचं , दुबळेपणाचं! विसर्जन केलं पाहिजे द्वेषाचं, तिरस्काराचं! विसर्जन करावं रागाचं, लोभाचं मोहाचं आणि मत्सराचं!

मध्यंतरी लाॅकडाउनच्या काळात हे लक्षात आलं की ज्या गोष्टींना आपण कवटाळलं आहे अशा या गोष्टींची जगण्यासाठी काही एक गरज नाहीय. उलट जगण्यासाठी काय आवश्यक असेल तर ते आहे कुटुंब, नात्यांमध्ये असणारा ओलावा, माणुसकी, आरोग्य आणि आपल्या माणसांचा भक्कम आधार, मित्रपरिवार! या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर कोरोनाच काय, कोणतेही संकट येऊ देत तुम्ही कधीच खचुन जाणार नाहीत!

एवढा मोठा जगाचा नियंता जर स्वतःचे विसर्जन करुन घेतो, तर आपण या क्षुल्लक गोष्टी सोडायला काय हरकत आहे? जमलं तर पाहा विचार करुन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *