सौ. शुभांगी शरद गमे
(लेखिका या शिक्षिका असून संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूगाव येथे कार्यरत आहेत.)
Pckhabar- अपवाद वगळता माझ्यासारखे पन्नाशीच्या पुढचे शिक्षक डिजिटल दुनियेपासून चार हात लांबच होते. आम्ही या क्षेत्रात तसे नवशिखे, आम्हाला आमच्या मुलांनी कितीही वेळा कॉम्प्युटर, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईलमध्ये फंक्शन समजावून सांगितले तरी आमची गाडी जरा ‘स्लोच’ चालणार. काय गं आई तुला किती वेळा समजावून सांगितले तरी येत नाही. असं मुलांनी म्हणाल की बऱ्याच वेळा त्यांचा नाद सोडून द्यायचो. व्हॉट्सअप चे मेसेज फॉरवर्ड करेपर्यंत आमची आतापर्यंतची झेप !
कोरोनासारखे जागतिक संकट देशासह राज्यात आले आणि या महामारीमुळे 16 मार्चपासून शाळा बंद झाल्या. सुरुवातीचा काळ लाॅकडाऊन, कोरोनाची धास्ती, टिव्हीवरच्या बातम्या, घरातील कामे यामध्ये एक महिना कसा गेला ते कळलेच नाही. मात्र, एप्रिल, मे पासून बेचैनी वाढली. अजुन किती दिवस असेच चालणार हे कळत नव्हते. वारंवार ऑनलाईन-ऑनलाईन, वर्क फ्रॉम होम हे शब्द कानावर पडू लागले. व्हॉट्सअप, युट्युबवरील शैक्षणिक व्हिडिओ बघायला सुरुवात झाली. आपणही असा व्हिडिओ तयार करू शकतो का? याचे मुलांकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. ज्यांना लहानपणी अ,ब,क,ड शिकवले तेच आता माझे शिक्षक होवून ऑनलाईनची बाराखडी शिकवू लागले.
आमच्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील आम्हाला मीटिंगमध्ये नेहमी सांगत की, काही वर्षांनी मुल घरीच राहून लॅपटॉप, आयपॉडवर शिकतील. शिक्षक विद्यार्थ्यांना घरूनच शिकवतील. तर तुम्ही आतापासून अपडेट रहा. नवीन गोष्टी शिका. परंतु मला वाटायचे तोपर्यंत तर मी रिटायर होईल. आणि मला ते जमणार नाही. पण त्यांचे शब्द आज कोरोनामुळे खरे ठरले. रिटायर होण्यापूर्वीच मला झूम अॅप, गूगल मीट हे शब्द जवळचे वाटू लागले. ऑनलाईन तास घेताना काही वेळा गडबड होते. गमती-जमती घडतात. ऑनलाईन तास घेताना अनेक गोष्टी शिकायलाही मिळतात. खरोखरच कोरोनाने माझ्यात पाॅझिटिव्ह बदल करत शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते.
माझी सहकारी सौ. वंदना पवार ही अँड्रॉइड मोबाईल फक्त कॉल करण्यासाठी वापरायची आणि मला काही त्यातलं काही समजत नाही असं म्हणायची. तिलाच आज तिची मुलगी आई आता मोबाईल बाजूला ठेव असे म्हणते. कारण व्हॉट्सअप वरून विद्यार्थ्यांशी सतत संवाद चालू असतो. म्हणजे कोरोनाने आम्हाला ‘पाॅझिटिव्ह’ केलंय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.










Leave a Reply