नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर आजपासून रुग्णांच्या सेवेत
Pckhabar- पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पीएमआरडीच्या वतीने नेहरुनगर येथे उभारण्यात आलेले जम्बो कोविड केअर सेंटर आजपासून प्रत्यक्षात रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. कोविड सेंटरचे निर्जंतुकीकरण केले असून ऑक्सिजनची टेस्ट देखील झाली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
आजपासून रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्सिजनची टेस्ट झाली असून सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतली आहे. सध्या 200 बेड कार्यान्वित आहेत. त्यात आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड आहेत. यामुळे बेडची उपलब्धता वाढली असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.
…असे आहे नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर!
अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील 816 खाटांचे स्वतंत्र कोवीड- 19 रुग्णालय आहे. 616 ऑक्सिजन युक्त खाटा व 200 आयसीयू खाटांची सुविधा आहे. अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. 3900 चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित केले आहे. रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ11 हजार 800 चौरस मीटर इतके आहे. 20 हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात येत आले असून यासाठी 4 हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय उभारण्याचा व 6 महिने चालवण्याचा अंदाज खर्च 85 कोटी इतका अपेक्षित आहे. अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा )इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च 50 टक्के राज्य शासन व 50 टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल.










Leave a Reply