‘रोगप्रतिकारक शक्ती: समज व गैरसमज’

‘रोगप्रतिकारक शक्ती: समज व गैरसमज’
(डॉ. अंकुश जाधव)

Pckhabar- हरणाच्या पाळण्याचा वेग ताशी ९० कि. मी. तर वाघाचा ६० कि. मी. तरीपण वाघ हरणाची शिकार करतो. कारण, हरणाच्या मनात भीती असते की, आपण वाघापेक्षा कमजोर आहोत. ही भीतीच हरणाला वारंवार मागे पाहण्यास भाग पाडते. त्यात त्याचा वेग व मनोबल कमी होते आणि अखेर वाघ हरणाची शिकार करतो.
या व्हॉट्सअपवर फिरत असणाऱ्या”सुप्रभात” मेसेज प्रमाणेच काहीसा प्रकार कोरोनाच्या बाबतीत ही होत आहे. शरीरात निर्माण होणाऱ्या कोणत्याही अस्वास्थ्याशी(dis-ease) झगडून रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनित्यटी ही यंत्रणा शरीरात स्वास्थ्य (ease) कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती किती तरी पटीने अधिक असताना केवळ भीतीमुळे काही लोक कोरोनाबधित होत आहेत, यात शंकाच नाही.
लोकांना सर्वात प्रथम रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व समजले ते ३०/३५ वर्षा पूर्वी आलेल्या एचआयव्ही-एड्स या आजारामुळे. आजच्या सारखीच रोगप्रतिकारक शक्ती विषयी परस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. पुढे एड्स सामान्य झाला व लोक रोगप्रतिकारक शक्ती विसरूनही गेले. आता त्याची पुन्हा आठवण आली ती कोरोनाच्या महासाथीमुळे. कारण ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना कोरोना होण्याची शक्यता अधिक असते, असे सर्वत्र सांगितले जाऊ लागल्याने लोक पुन्हा रोगप्रतिकारक शक्ती विषयी सतर्क होऊ लागले. वास्तविक कोणताही आजार हा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानेच होत असतो. त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती चे महत्व अबाधित व कायमचेच आहे. हे वास्तव लोक विसरले. याविषयी लोकांना पुन्हा जागरूक केले ते कोरोनाने. आता उपलब्ध असलेल्या मेडिया, टीव्ही, पेपर, मोबाइलवरची व्हॉट्सअप व फेसबुक युनिव्हर्सिटी या साधनांनी सातत्याने रोगप्रतिकारक शक्ती हा शब्द कानावर आदळू लागला. डोळ्यासमोर दिसू लागला. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे व रोगप्रतिबंधक उपायही आयुष मंत्रालयासाहित हजारो डॉक्टर, मोबाईल व ज्यांना कसलीही माहिती नाही ( डॉक्टर होणे सर्वात सोपे आहे म्हणून) असे लोक ही आपल्या पोतडीतले उपाय सुचवू लागले आणि कोरोनाच्या भीतीने घाबरलेले लोक ही जो कोणी उपाय सुचवेल तो करू लागले. काही वेळा चुकीच्या पद्धतीने, काही वेळा एकाच वेळी अनेक/सर्व उपाय तर काही वेळा अतिरेक करून उपाय करू लागले. परिणामी त्याचे दुष्परिणाम ही दिसू लागले.
उपलब्ध सर्व काढयांचा विचार केला तर सामान्यतः सर्व काढ्यात तुळशीची पाने, दालचिनी, काली मिरी, लवंग, आले. (काही काढयात तर गूळा इतके आले घालावे असें सांगितले आहे.) सुंठ, त्रिकटु ( सुंठ, मिरी, पिंपळी) ही औषधी द्रव्ये आहेत. ही सर्व द्रव्ये उष्ण आहेत( पहा- मसाल्याचे पदार्थ-पुण्यनगरी,२७, २८एप्रिल) या द्रव्यांनी शरीरात उष्णता निर्माण होते. ज्या काळात कोरोना फॉर्ममध्ये होता. तो एप्रिल, मे, जून हा काळ अत्यंत उष्ण वातावरणाचा होता. यातले काही काढे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तर काही विलगिकरांनातील लोकांसाठी फक्त १० दिवस घेण्यासाठी होता. परंतु लोकांनी याचा उपयोगचुकीच्या पद्धतीने केला. परिणामी शरीरात उष्णता वाढली व त्याच बरोबरच बाहेर ची उष्णता (आता ही आयुर्वेदानुसार पिताचा काळ आहे) या कारणाने बऱ्याच लोकांना घश्यात जळजळ होणे, पोटात जळजळ होणे, तोंड येणे, अन्न नलिकेत जखमा होणे, पोटात दुखणे, नाकातून रक्त येणे, मूळव्याध व गुदमार्गावाटे रक्त पडणे इ. लक्षणे दिसून आली.
आज इम्युनो बुस्टर वा इंम्युनिटी बूस्टर म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे पेव फुटले आहे. आज हजारो आयुर्वेदिक, युनानी औषधे गोळ्या, कॅप्सूल, सिरप इ. स्वरूपात बुस्टर म्हणून विकली जात आहेत. एप्रिल ते जुलै या महिन्यात मोठ्या प्रमाणात या औषधांची विक्री झाली. इम्युनो बूस्टर आईस्क्रीम, च्यवनप्राश मिल्क शेक, बिस्कीटे तसेच प्रीझरवेटीव घातलेले आवळा, कोरफड ज्यूस अशा कित्येक गोष्टी इंमुनिटी बूस्टर नावाखाली विकल्या जात आहेत व घाबरलेले लोक खरेदी करत आहेत.
वास्तविक तूप खाल्ले की रूप येत नाही, पी हळद हो गोरी असे होत नाही. तीच गोष्ट रोगप्रतिकारक शक्तीच्या बाबतीत पण आहे. कुस्ती करण्यासाठी पैलवानाला बरेच दिवस अगोदर सराव करावा लागतो, विधार्थ्याला परीक्षेत पास होण्यासाठी परीक्षेच्या अगोदर दिवस अगोदर अभ्यास करावा लागतो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीचे आहे. रोग आला की वाढव रोगप्रतिकारक शक्ती असे होत नाही.
वास्तविक इंम्युनिटी वाढली की नाही हे पाहण्यासाठी साधी, सरळ व सोपी अशी कोणतीही चाचणी उपलब्ध नाही. रोगप्रतिकारक शक्ती व त्यासाठीची यंत्रणा ही अत्यंत गुंतागुंतीची व किचकट आहे. आपणाला फक्त पांढऱ्या पेशी याच रोगांपासून शरीराचे संरक्षण करतात एवढेच माहीत असते.
नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरात असतेच. ती व्यक्ती नुसार कमी, जास्त असते एवढेच. वास्तविक फार कमी लोकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविनाऱ्या औषधांची गरज असते. उदा. गरोदर स्त्रिया, बालकांना दूध पाजणाऱ्या माता, नेहमी आजारी असणाऱ्या व्यक्ती, वृद्ध इ. सध्या वाढलेले प्रदूषण, मानसिक ताण तणाव, अशांत झोप, जहाल औषधांचा अत्याधिक वापर इ. कारणांचा रोगप्रतिकारक शक्ती वर परिमाण होतो.
रोगप्रतिकारक शक्ती ही काही जादू नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून ही कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसून ती योग्य आहार, कोणत्याही स्वरूपाचा नियमित व्यायाम, शांत ७/८ तास झोप, मानसिक शांतता, पंचनसंस्थेतील सूक्ष्म जीव ( मिक्रोफ्लोरा-७०टक्के रोगप्रतिकारक शक्तीचे वास्तव्य पोटातील आतड्यात असते. म्हणून पोटाचे आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्वाचे आहे) काही काळ सूर्यप्रकाशात राहणे, चांगले मित्र असणे, चांगले कर्म करणे व स्वतःवर विश्वास या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *