पुण्यातील मानाच्या गणपतींचे मंदिरातच विसर्जन

पुण्यातील मानाच्या गणपतींचे मंदिरातच विसर्जन

Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणपती मंडळांनी  ‘श्रीं’चे विसर्जन सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडप व मंदिरातच करणार असल्याची माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेला श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, मानाचा पाचवा गणपती ‘केसरी गणेशोत्सवा’चे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांसह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा गणपती ‘केसरी गणेशोत्सव’ आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे.

परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी 10.30 वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील व त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कसबा गणपती चे विसर्जन होईल. त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी 12.15 वाजता, श्री गुरुजी तालीमचा गणपती दुपारी 1 वाजता, श्री तुळशीबाग गणपती दुपारी 1.45 वाजता, मानाचा पाचवा गणपती ‘केसरी गणेशोत्सवा’चे दुपारी 2.30 वाजता, श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी 3.15 वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी 7 वाजता विसर्जन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *