Pckhabar- ओमकार तरुण मंडळ, तुंगार्ली आणि पूना सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांतर्गत सुमारे ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपलं सामाजिक कर्तव्य बजावले.
लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवि पवार यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे मानद अध्यक्ष नगरसेवक राजू बच्चे, अध्यक्ष हरीलाल बोरकर, उपाध्यक्ष सुनील अंभोरे, जयवंत गोसावी, ज्ञानेश्वर येवले, किरण येवले, नितीन गायकवाड, पंढरीनाथ वाडेकर, प्रकाश लोखंडे, प्रसाद मावकर, नंदू पाडाळे, किशोर पवार आदींसह कार्यकर्ते सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत उपस्थित होते. या उपक्रमात मंडळाच्या पुरुष कार्यकर्त्यांसोबतच, महिला कार्यकर्त्यांनी देखील रक्तदान करीत आपला सहभाग नोंदवला. या सर्व रक्तदात्यांना मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.
तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळ एक आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाते. सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक भरीव असे उपक्रम या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात आणि हे उपक्रम वर्षभर सुरू असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर, सॅनिटायजर आणि मास्कचे वाटप, कोरोना पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम, झिंक, व्हिटॅमिन सी यासारख्या गोळ्यांचे वाटप, लोणावळा नगरपरिषदेला ऑक्सिमिटर आणि थर्मामीटरची मदत असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे.










Leave a Reply