Dehu News : श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उद्यापासून तीन दिवसीय सृजनदीप व्याख्यानमाला

Dehu News : श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उद्यापासून तीन दिवसीय सृजनदीप व्याख्यानमाला
Pckhabar- आदर्श पालकत्त्वाची जडणघडण व्हावी, शिक्षकांमधील विविध पैलूंचा विकास व्हावा तसेच अगदी लहान वयापासूनच विद्यार्थी मनावर संस्कार रुजविण्यात यावेत या हेतूने गेली चार वर्षे श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सृजन फाउंडेशन संस्थेच्यावतीने तीन दिवसीय ‘सृजनदीप व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात येते.

गुरुवार, दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘संस्कारांचे सामर्थ्य’ या विषयातून लेखक, विचारवंत, माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफणार असून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव मा. सतीशराव उरसळ हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त हभप डॉ. भावार्थ देखणे हे ‘यशाची गुरुकिल्ली’ या विषयातून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे असतील.

शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्नेहवन संस्थेचे संस्थापक श्री व सौ अशोक देशमाने यांची इ. सातवीतील चार विद्यार्थी प्रकट मुलाखत घेणार आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या लेकरांचे मोफत शिक्षण व संगोपन करणाऱ्या श्रीक्षेत्र आळंदी जवळील कोयाळी फाटा येथे असणाऱ्या स्नेहवन संस्थेचे संस्थापक श्री अशोक व अर्चना देशमाने यांना मावळ तालुक्याचे आमदार श्री. सुनील आण्णा शेळके यांच्या शुभहस्ते या वर्षीचा ‘सृजनसेवा पुरस्कार’ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच शाळेने राबवलेल्या ‘दिवाळी मेळा’ या उपक्रमातून झालेल्या नफ्यातील रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश स्नेहवन संस्थेला यानिमित्ताने देण्यात येणार आहे अशी माहिती सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद व सचिव प्रा. विकास कंद यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *