Article By Balaji Shinde : दिव्यांगत्व आणि विवाह : सामाजिक बहिष्कारातून समावेशकतेकडे वाटचाल
pckhabar- दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाच्या प्रश्नाकडे पाहिल्यास समाजातील खोलवर रुजलेल्या भेदभावांचे चित्र उघड होते. काही वर्षांपूर्वी पुण्यात दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित वर–वधू परिचय मेळाव्याला उपस्थित राहिल्यावर हा वास्तवाचा प्रत्यय आला. सुमारे तीनशे सहभागींपैकी अवघ्या सतराअठरा महिला होत्या; उर्वरित सर्व पुरुष. समूहातील ओळख सत्रात ही विषमता अधिक ठळकपणे जाणवली. प्रश्न पडतो—या शेकडो पुरुषांपैकी उर्वरितांचे काय? आणि महिलांचा सहभाग इतका नगण्य का?
या प्रश्नामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक अडथळे आहेत. महिलांना घराबाहेर पडण्यापासून रोखणारी सामाजिक भीती, भौतिक सुगम्यता (Physical Accessibility), दिव्यांगत्वाबाबतचा लिंगाधारित दृष्टिकोन आणि सुरक्षिततेच्या चिंतेतून घेतले जाणारे निर्णय—या सगळ्यामुळे महिलांच्या सक्रिय सहभागावर बंधनं येतात.
एका आईचा अनुभव आठवतो—पासष्ट वयाची ही वृद्ध माता, तरीही आपल्या साधारणत: बेचाळीस वयाच्या व्हिलचेअर वर बसलेल्या शारीरिक दिव्यांग मुलाच्या विवाहासाठी धडपडत होती. तिच्या मृत्यूनंतर मुलाचे भविष्य काय असेल, ही सततची काळजी तिच्या मनात असावी. दुसरीकडे, अपघातानंतर पाय गमावलेल्या एका तरुणाची कहाणी आहे—ज्याला अचानक आलेल्या शारीरिक दिव्यांगत्वामुळे पत्नीने सोडून दिलं आणि जो आता नव्या जोडीदाराच्या शोधात आहे. मेळाव्यात आलेले बहुतांश जण हे तीस ते चाळीस वयोगटातील होते.
पण या चित्राला दुसरी बाजूही आहे—शिक्षणात व नोकरीत प्रचंड संघर्ष करून यश मिळवलेल्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या, परंतु वैवाहिक आयुष्याचा विचार केला की घरच्यांकडून सतत रोखल्या जाणाऱ्या दिव्यांग महिला. स्वतःचे भविष्य घडवणाऱ्या या महिलांना लग्नाचा विचार मांडल्यावर “नको ती कल्पना” म्हणून गप्प बसवले जाते. दिव्यांग मुलांसाठी सून शोधणारे पालक, पायाला भिंगरी लावून पळणारे असतात; पण त्याच वेळी आपल्या मुलींना लग्नाचा विचारही करू नको, असा निर्वाणीचा सल्ला देतात. हा दुहेरी निकष स्त्री–पुरुष दिव्यांगत्वाच्या संकल्पनांमध्ये खोलवर रुजलेला आहे.
यात भर घालते ती दिव्यांग महिलांबाबतची पारंपरिक अपेक्षा—घर चालवता येईल का, स्वयंपाक करता येईल का, घरकाम जमेल का, या निकषांवरच त्यांच्या पात्रतेचा निर्णय केला जातो. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, भावनिक समजूतदारपणा यांकडे मात्र दुर्लक्ष होते. पुरुषांना अशा निकषांतून कधीच जावे लागत नाही. ही पद्धत केवळ स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण समतेच्या संकल्पनेलाच विरोध करते.
स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर—मला शारीरिक दिव्यांगत्व असल्यामुळे, सुरुवातीला उत्साह दाखवणाऱ्या काही मुलींच्या घरच्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नकार दिला. याउलट, पूर्वी बेरोजगार असलेल्या माझ्या भावासाठी सहज मुली देऊ पाहणारे पालक भेटले; जरी मी अफाट संघर्ष करून नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन, नोकरीतून स्थिर उत्पन्न तसेच पूर्णपणे आर्थिक स्वावलंबी आणि एकंदर अतिशय होतकरू व मेहनती असलो तरी—हे वास्तव खूप काही सांगते. एक प्रसंग तर विशेष क्लेशदायक होता—वर्षानुवर्षे परिचित असलेल्या, एकमेकांना समजून घेतलेल्या आणि आम्ही दोघेही लग्नाचा विचार करू करणाऱ्या माझ्या संभाव्य जोडीदाराच्या सुशिक्षित आईने, मी एक पाय गमावलेला आहे हे ऐकताच कोणतीही चौकशी न करता सरळ नकार दिला. माझे शिक्षण, स्वभाव, विचार, पार्श्वभूमी—काहीच विचारात घेतले नाही.
हे सगळे अनुभव केवळ ‘बाहेरचे’ भेदभाव दाखवत नाहीत; तर दिव्यांग समुदायामधीलही अंतर्गत भेद उघड करतात. दिव्यांगत्वाचा प्रकार, तीव्रता, दृश्यमानता—यांच्या आधारे एक अदृश्य ‘क्रमवारी’ तयार होते. सौम्य दिव्यांगत्व असलेल्यांना दिव्यांग नसलेला जोडीदार हवा, तर अधिक तीव्र दिव्यांगत्व असलेल्यांना कमी तीव्रतेचा जोडीदार हवासा वाटतो. ही मानसिकता समुदायाच्या स्वातंत्र्यवादी भूमिकेलाही छेद देते.
तरीही दुसरीकडे काही जण असेही आहेत जे दिव्यांग व्यक्तीशीच विवाह करावा अशी इच्छा बाळगतात—कारण त्यांच्या मते, त्यांच्या अनुभवांची व भावनिक जाणीवांची खरी समज केवळ दिव्यांग व्यक्तीलाच होऊ शकते. ही भावना ‘निमित्तबद्धता’ नव्हे, तर ‘समजुतीवर’ आधारित असू शकते.
तथापि, आजही दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाच्या बाबतीत दिव्यांगत्व हीच सर्वात निर्णायक ठरते. व्यक्तिमत्त्व, मूल्ये, शिक्षण, आवडीनिवडी, जीवनदृष्टी—हे सारे निकष दुय्यम ठरतात. ही अपूर्णतेची आणि एकांगी मानसिकता समाजाच्या वैचारिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे करते.
एक क्लेशदायक उदाहरण—सेरेब्रल पाल्सी असलेली माझी एक मैत्रीण पुण्यातील एका प्रतिष्ठित विवाह जुळवणी केंद्राकडे (Marriage Buero Center) गेली तेव्हा तिला “तुम्हालाही लग्नाची इच्छा असते?” असा उपहास ऐकावा लागला. या अपमानकारक वागणुकीतूनच विवाह आणि दिव्यांगत्वाच्या प्रश्नांतील मानसिकतेची खोली स्पष्ट होते. आजही किती विवाह जुळवणी केंद्रे खरोखरच ‘समावेशक’ आहेत?
बदलासाठीची दिशा
व्यवस्था पातळीवर :
सरकारी (Government) आणि सामाजिक संस्था(Non- Government Institutions) यांनी दिव्यांग आणि बिगरदिव्यांग व्यक्तींना एकत्र आणणारी, सखोल ओळख घडवणारी विवाह व्यासपीठे उभारली पाहिजेत. जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आंतरजातीय विवाह (Inter-caste marriage) आणि सहभोजन (Inter-caste dining) ही जातीप्रथा निर्मूलनासाठी आवश्यक पायरी आहे, तसेच आंतर–दिव्यांगत्व विवाहही दिव्यांगत्वावरील कलंक तोडणारे ठरू शकतात आणि दिव्यांग–बिगरदिव्यांग यांच्यातील दरी कमी करू शकतात.
काही राज्य सरकारांच्या योजना दिव्यांग व्यक्तींशी विवाह करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देतात; पण त्यामुळे अनेकदा “लेन–देनाधारित” विवाह घडतात, भावनिक नातेसंबंध नव्हे. खरा समावेश हा परस्पर आदर, विचारांची समांतरता आणि भावनिक जुळवून घेण्यावरच आधारित असला पाहिजे.
आजचे विवाह मेळावे केवळ पाच–दहा मिनिटांत जोडी ठरवण्याचे प्रकार झाले आहेत. एवढ्या कमी वेळात आयुष्यभराचा निर्णय होऊ शकतो का? यासाठी सखोल चर्चा, समुपदेशन आणि दीर्घकालीन समज यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नव्या प्रणालींची आवश्यकता आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या पातळीवर :
विवाहप्रणालीत बदल घडवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या कुटुंबांशी संवाद साधणे अत्यावश्यक आहे—विशेषतः मुलींनी. त्यांच्या इच्छांचा, स्वप्नांचा आणि सहजीवनाच्या अधिकाराचा पालकांसोबत मोकळा संवाद व्हायला हवा.
समाजात व समुदायात असलेले दिव्यांगत्वावरील अंतर्गत भेदभावही आपण ओळखून नष्ट करायला हवेत. सौम्य दिव्यांगत्वाला वरदान मानणारी मानसिकता आणि तीव्र दिव्यांगत्व असणाऱ्यांची नकारात्मक छबी हीच खरी समस्या आहे.
दिव्यांग व्यक्तींनी स्वतःला बंदिस्त न ठेवता सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधावा, सामाजिक व्यवहारात सक्रिय सहभाग घ्यावा, कमीपणाची भावना झटकून आत्मविश्वासाने जीवनाकडे पाहावे. प्रेम, आदर आणि स्नेह हे सर्वांच्याच हक्काचे आहेत—कोणत्याही शारीरिक स्थितीवर अवलंबून नसणारे. आत्मविश्वास, विचारांची मोकळीक आणि भावनांची स्पष्टता ही भक्कम, आदरयुक्त व प्रेमळ नातेसंबंध घडवू शकते.
समाज म्हणून आपण जेव्हा जात, वर्ग, लिंगभाव, शरीराची रचना, त्वचेचा रंग आणि शारीरिक किंवा बौद्धिक दिव्यांगत्व या सर्व विविधतेला सन्मान देऊ, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने समावेशक होऊ. शिक्षण, मूल्ये आणि आत्मनिर्भरता असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाही इतरांप्रमाणेच प्रेम, सन्मान आणि सहजीवनाचा हक्क आहे—हा संदेश आपण सतत पोहोचवत राहायला हवा.
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने न्याय्य, संवेदनशील आणि करुणामय समाजाच्या उभारणीकडे वाटचाल करत आहोत, असे निश्चयपूर्वक म्हणता येईल.
#समतेच्या_वाटेने
#दिव्यांग_समावेश
#लग्नसमानता
#सामाजिकन्याय
#प्रेमसर्वांसाठी
#समावेशकसमाज
#आंतरसांस्कृतिकता
#दिव्यांगसक्षमीकरण










Leave a Reply