Dehu News : धर्म व पंथ यापेक्षा माणूसकी मोठी – श्री. सचिन पवार
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आयोजित सृजनदीप व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प आज संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी दर्पणचे संपादक श्री.सचिन पवार यांच्या अभ्यासपूर्ण अमोघ वाणीतून ‘फुले, शाहू, आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर संपन्न झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, धर्म, पंथ यापेक्षा माणूसकी मोठी आहे, हाच विचार फुले-शाहू-आंबेडकर यांनी समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, विधवा पुनर्विवाह, देवदासी, मुरळी, घरगुती हिंसाचार, आंतरजातीय विवाह, शेती, पाणी अशा कितीतरी प्रश्नांना त्याकाळात वाचा फोडली नसती तर आज कदाचित परिस्थिती फार बिकट झाली असती. महात्मा फुलेंचा हाच विचार छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुढे घेऊन गेले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हाच विचारांचा वारसा पुढे नेला. आज समाजातील भेदाभेद संपून मानवतेचे नाते दृढ होण्यासाठी आपल्या संतांनी, महापुरूषांनी आपल्या विचार व कृतीतून दाखविलेल्या समतेच्या विचारांची, सामाजिक प्रबोधनाची, परिवर्तनशील व्याख्यानांची विद्यार्थ्यांसाठी नितांत गरज आहे. यातूनच एक संस्कारसंपन्न सुंदर माणूस घडणार आहे.
विद्यार्थ्यांनी तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, एक कुणालाही कधी कमी लेखू नये, दुसरी खूप खूप शिकायला हवे आणि तिसरी टेबल व खुर्चीची सत्ता मिळवायला हवी, म्हणजेच अधिकार मिळवायला हवे. सर्व समाजसुधारकांनी समाज एकत्र रहावा हीच शिकवण दिली, हीच भावना या व्याख्यानमालेच्या निमित्ताने श्री.सचिन पवार यांनी व्यक्त केली.
पंचायत समिती, मावळचे माजी सभापती मा. निवृत्तीभाऊ शेटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
तसेच गोडुंब्रे गावचे वि.का.स. सोसायटीचे माजी चेअरमन मा. दत्तात्रय सावंत, मा. ज्ञानेश्वर सावंत, श्रीराम विद्यालयाचे अध्यक्ष मा. सुरेशराव शेटे, कामगार नेते मा. मच्छिंद्र हगवणे, उद्योजक मा. संपत शेटे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, सचिव प्रा. विकास कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक, आदि मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका रेखा अडागळे यांनी व्याख्याते श्री. सचिन पवार यांचा परिचय करून दिला. सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन प्राप्ती शहाणे यांनी केले.











Leave a Reply