Dehu News : शिवाजी महाराजांनी नरदुर्ग तयार करुन राष्ट्रीय चारित्र्य घडविले – प्रा. नितीन बानुगडे पाटील

Dehu News : शिवाजी महाराजांनी नरदुर्ग तयार करुन राष्ट्रीय चारित्र्य घडविले – प्रा. नितीन बानुगडे पाटील

Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आयोजित सृजनदीप व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प आज शिवव्याख्याते, इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या अभ्यासपूर्ण अमोघ वाणीतून ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर संपन्न झाले. यावेळी बोलताना बानुगडे पाटील म्हणाले की, कित्येकांनी जलदुर्ग,भूदुर्ग असे अनेक दुर्ग तयार केले पण छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या स्वरुपातील नरदुर्ग तयार करुन राष्ट्रीय चारित्र्य घडविले आहे.

‘प्रतापगडचा रणसंग्राम’ हा विषय मांडताना सरांनी छत्रपतींच्या अंगी असलेली गुणवैशिष्ट्ये उलगडली. ते म्हणाले की, छत्रपतींनी हे स्वराज्य तलवारीच्या धारेवर नाही तर पाठीवर पडणाऱ्या कौतुकाच्या थापेवर उभं केलं. आपण काम काय करतो? कसं करतो? हे महत्वाचे नाही तर त्या कामाचं नियोजन कसं करतो हे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच महाराजांचा अभ्यास, जिज्ञासा हेच त्यांच्या यशाचं कारण आहे. अपयशाचे कारण विना अभ्यास आणि यशाचे कारण म्हणजे फक्त अभ्यास! छत्रपतींच्या ठायी असलेला मुत्सद्दीपणा, सामुहिक संघटन, जिज्ञासू वृत्ती, सूक्ष्म नियोजन हे सर्व गुण मार्मिक उदाहरणांतून उलगडून दाखविले. जगेन तर स्वराज्यासाठी आणि मरेन तर स्वराज्यासाठी असे म्हणणारी निष्ठावान माणसे स्वराज्याला जोडली गेली ती महाराजांमुळे. महाराजांनी ही निष्ठा प्रत्येकात पेटवली. शत्रूच्या स्त्रिलाही सन्मान देणारा हा राजा हेच खरं महाराष्ट्राचं चारित्र्य आणि नैतिक मूल्य आहे.

प्रतापगडावरील महाराजांचे नियोजन कौशल्य, शत्रूचे मानसिक खच्चीकरण अशा गुणयुक्त चित्तथरारक वर्णनाने तो प्रसंगच साक्षात् उपस्थितांच्या डोळ्यांसमोर साकारला. अंगावर रोमांच उभा करणारा हा प्रतापगडचा रणसंग्राम रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन गेला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. डॉ. आर. एम. मिसाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी दिवाळी मेळ्यातून आलेल्या नफ्याची रक्कम रु. ५१,०००/- चा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अनाथ मुले संभाळणाऱ्या शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक प्रा. यशवंत गोसावी व सेक्रेटरी सौ.पूनम गोसावी यांना पालक व विद्यार्थ्यांच्या साक्षीने सुपूर्द करण्यात आला.

पूर्व प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत हवेली तालुका ग्रामीण मधून १५ वे स्थान पटकावित शिष्यवृत्तीचा मानकरी ठरलेला कु.अथर्व माने व कु. ऐश्वर्या कवडे यांना कै. दशरथ बाळासाहेब कंद यांच्या स्मरणार्थ अनुक्रमे रु.५,००१/- व रु.३,००१/- चे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या व्याख्यानमालेच्या प्रसंगी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, इंद्रायणी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम गवारे, समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजी गवारे, व्याख्याते मा. राजेंद्र घावटे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पर्यवेक्षिका शुभलक्ष्मी पाठक, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने रसिक पालक श्रोते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी केले तर सृजन फाउंडेशनचे संचालक सौरभ कंद यांनी शिवव्याख्याते बानुगडे पाटलांचा परिचय श्रोत्यांना करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव तर आभारप्रदर्शन सौ. भारती थोरात यांनी केले.


शिवनिश्चल ट्रस्टला 51 हजारचा धनादेश सुपूर्त
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचा संभाळ करणाऱ्या शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक,अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी व सचिव सौ. पुनम गोसावी यांस दिवाळी मेळ्यातून झालेला नफा रु. 51 हजार चा धनादेश सुपूर्त…

——–


शिष्यवृत्ती प्राप्त झालेला कु. अथर्व माने यास सृजन फाउंडेशनच्या वतीने रु. पाच हजार एकचे बक्षीस


शिष्यवृत्ती प्राप्त झालेली विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या कवडे हिस सृजन फाउंडेशनच्या वतीने रुपये तीन हजार चे बक्षीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *