Dehu News : ‘अभंग’ दिवाळी मेळ्यास बालचमूंसह पालकांचा उदंड प्रतिसाद
Pckhabar- सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे आयोजित ‘अभंग दिवाळी मेळा’ सरस्वती लाॅन या ठिकाणी आयोजित केला होता. बालचमुंसह पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहत या सामाजिक उपक्रमास हातभार लावला आहे.

अभंग दिवाळी मेळ्याच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण परिसर पालक व विद्यार्थी यांनी फुलून गेला होता.
देहूच्या माजी सरपंच शुभांगीताई मोरे, माजी सरपंच सुनिता टिळेकर, सौ. माई मोरे, शाळेच्या पालकप्रतिनिधी ॲड. स्वाती हगवणे यांच्या शुभहस्ते दिवाळी मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. माजी सरपंच सुनिता टिळेकर यांनी अभंग दिवाळी मेळ्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, सचिव प्रा. विकास कंद, संचालक प्रशांत काळोखे उपस्थित होते.
अभंग दिवाळी मेळ्यात पालक व विद्यार्थी यांनी मनोरंजनात्मक खेळांना अधिक पसंती दिली. शिक्षकांच्या कल्पनेतून साकारलेल्या १६ खेळांचा समावेश या गेम झोन मध्ये करण्यात आला होता. खेळामध्ये जिंकणाऱ्या प्रत्येक मुलाला आकर्षक भेटवस्तू ही देण्यात येत होती, म्हणूनच गेम झोन मधील गर्दीचा ओघ वाढताच राहिला. या खेळांसोबतच मिकी माऊस, जंपिंग जॅक, मेरी गो राऊंड या साऱ्याच खेळांसाठी मुलांनी एकच गर्दी केली होती.
दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील, तोरणं, रांगोळीचे स्टीकर्स, किल्ल्यांसाठी विविध प्रकारची मावळ्यांसह चित्रे, पूजेचे साहित्य, मुलांनी रंगविलेल्या पणत्या या साऱ्याच वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांची एकच झुंबड उडाली होती.
महिला पालक व मुलींसाठी मेहंदीचे काउंटर विशेष आकर्षण ठरले. लहान मुलांनी तर हातावर व चेहऱ्यावर टॅटू काढून घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. पालक व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तूही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. लिटिल सायिंटिस्ट हा सेल्फी काॅर्नर साऱ्याच बालचमूंचा विशेष आकर्षण ठरला.
दिवाळी मेळ्या मध्ये पालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची रुचकर मेजवानी ही ठेवण्यात आली होती. या खाद्यपदार्थांवर पालकांनी येथेच्छ ताव मारला.
यावर्षी दिवाळी मेळ्यातून येणारा नफा अनाथ मुलांचे संगोपन व शिक्षण करणाऱ्या शिवनिश्चल प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे. अभंग दिवाळी मेळा या सामाजिक उपक्रमास पालकांनी भरघोस प्रतिसाद देत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
अभंग दिवाळी मेळा हा दोन दिवस सुरु राहणार आहे. पहिल्या दिवशी पालकांनी जशी उपस्थिती दाखवली तशीच उपस्थिती दुसऱ्या दिवशीही दाखवत अभंग दिवाळी मेळा यशस्वी करावा असे आवाहन शाळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.











Leave a Reply