Pune News: इंदापूरप्रमाणेच फलटणला 14 ऑक्टोबरला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम – ज्येष्ठ नेते शरद पवार
Pckhabar- चित्र बदलतंय, आज हा कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला आज इंदापूरलाच आला आहात १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे? म्हणे इंदापूरला आहे तोच आमच्याकडे. मी विचारलं कुठे? म्हटले फलटणला. समजलं का? मग आता याच्यानंतर फलटण. फलटण झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस बुक झालेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे सबंध हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी (दि.७) इंदापूर येथे केले.
इंदापूरमध्ये भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते, सुप्रिया सुळे, आमदार अशोक पवार, महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेवाळे बापू, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, उत्तमराव जानकर यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
शरद पवार पुढे म्हणाले,
अतिशय समाधानाने आज या ठिकाणी या सभेमध्ये मी आलोय. हा ऋणानुबंध जुना आहे. १९६७ साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभासद म्हणून गेलो. त्या कालखंडामध्ये आम्ही लोक तरुण होतो .माझं वय २७ होतं. आम्हा तरुणांना मदत करणे, मार्गदर्शन करणे, मंत्रिमंडळामध्ये कसं काम करावं, व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवावी याचा आदर्श आम्हा सगळ्यासमोर त्यावेळचा असायचा तो म्हणजे शंकरराव भाऊंचा. एका जिल्ह्यातले शेजारी आणि वडीलधारे त्यामुळे त्यांचा अधिकार होता. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राचा मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मलाही मिळाली. मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करावा याचा आदर्श भाऊंनी आमच्या समोर ठेवला. त्यामुळे हा पुणे जिल्हा पुणे, जिल्ह्याचं राजकारण याचा ज्या ज्या वेळी मी विचार करतो तो विचार शंकराव भाऊंशिवाय पूर्ण होत नाही. मला आनंद आहे त्यांच्या विचारांचा वारसा स्वीकारून, गेले काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विधिमंडळामध्ये, सहकारी संस्थेमध्ये ज्यांनी काम केलं आणि काम करतायत ते हर्षवर्धन तुम्हा आम्हा सगळ्यांच्या बरोबर या कामाच्या पूर्ततेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाले.
शरद पवार पुढे म्हणाले,गेली काही वर्ष सहकारात त्यांचे अधिक लक्ष होते. मागच्या निवडणूका झाल्या. माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं. त्याच हेतून माझं लक्ष इंदापूरकडे होत. जाणून बुजून विचारपूर्वक इंदापूरच्या एका सहकार्याला प्रोत्साहन करण्याचं काम केलं, चेअरमन केलं, जिल्हा परिषदेचे प्रमुख केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले, मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह केला. त्याच्यामध्ये हेतू होता की इंदापूर तालुक्याचा दुष्काळ असेल, इथली कारखानदारीची वाढ असेल त्यासाठी काम करणारा कोणी सहकारी असला पाहिजे आणि त्या हेतूने हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती पण इथं आल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जे जे मी ऐकतोय माझ्यासारख्यालासुद्धा धक्का बसला. इंदापूरचा राजकारण शंकराव भाऊंचं राजकारण म्हणजे स्वच्छ चारित्र्याच राजकारण होतं .कुणाच्याही नव्या पैशाचा न करणारं राजकारण होतं. अलीकडच्या काळामध्ये इंदापूरचा राजकारणाला काहीतरी वेगळी दिशा काही लोकांनी दिली.
मी आता इथे बोर्ड वाचत होतो आणि त्या बोर्डावर लिहिलं होतं मलिदा गँग संपवा. मी बारामतीला ऐकतो मलिदा गँग आणि इथली सुद्धा गॅंग आहे हे अलीकडे कळायला लागल होत. ते तुम्ही कुणी सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी अनेक वर्ष काम केलं जवळपास ५५ वर्ष मी कुठल्या ना कुठल्यातरी पदावर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या ओळखी चांगल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्या बरोबर, माझ्या हाताखाली काम केलं. कधी भेटतात. सहज मी चौकशी करतो. आमच्या जिल्ह्याच कसं आहे? ते सांगतात, कि ते जुने दिवस राहिले नाहीत. म्हटलं काय झालं? कुठल, कशाचं काय सांगताय? ते म्हणाले इंदापूर तालुका, भाऊंच्या सारखा नेता त्यांचे व्यवहार कुठं आणि हल्लीच्यांचे व्यवहार कुठं याची चर्चा न केलेली बरी हे अधिकारी सांगायला लागले. इतका बदलौकिक, इतके चुकीचे विचार, इतकी चुकीची माहिती कधीही या भागातल्या नेतृत्वाच्या बद्दल आलेली नव्हती. दुर्दैवाने ती आलेली आहे. ते चित्र बदलायचे असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवा असेल तर कर्तृत्वान अशा प्रकारची कुवत असलेला नेता पाहिजे. आज हर्षवर्धनाच्या निर्णयाने ही पोकळी भरून निघेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नसल्याचे पवार म्हणाले.
आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो पक्ष वेगळा होता. माझा पक्ष वेगळा होता. पण महाराष्ट्राच्या या देशाच्या शेतकऱ्यांसाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. वसंतदादा साखर धंद्याची संस्था मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मॅनिजिंगमध्ये हर्षवर्धन आहेत, आम्ही भेटत होतो. पक्ष वेगळा होता पण या सगळ्या कालखंडामध्ये एकदा सुद्धा धोरणांबद्दल कधीही मतभेद नव्हते. एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या आणि त्यांच्या विचारात कधीही फरक पडला नाही. ज्या-ज्या वेळेला नवीन काही करायचं असेल तर ज्या दोन-तीन सहकाऱ्यांवर जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची त्यातील पहिले नाव हर्षवर्धनचे यायचे.
आज साखर धंदा, उसाचा धंदा हा आपल्या सर्वांचा महत्त्वाचा धंदा आहे. देशामध्ये दोन नंबरची साखर आणि उसाच्या पिकाचे क्षेत्र महाराष्ट्रात आहे. सबंध देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. अनेक निर्णय त्यांनी आणि मी एकत्र घेतले. अलीकडच्या काळात आणखी एक चांगली गोष्ट झाली. सर्व उसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉल गेले २५ वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ती जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सर्वजण एकत्रपणाने करत होतो. मोदी साहेबांचं हे सरकार आलं थोडी स्थिती बदलली. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही जे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती. जेव्हा आम्हाला काळजी वाटायची की, ऊस उत्पादकांचे काय होणार? साखरेच्या किमतीचे काय होणार? उसाच्या टनेला किंमत किती मिळणार? त्याचे काय होणार? नवीन धोरणं, नवीन प्रकल्प हातामध्ये घेतलंय त्याचे काय होणार? पण या संकटातून आम्हा सगळ्यांना आणि या महाराष्ट्राला काढायचं काम, दूर करण्याचे काम हर्षवर्धनने केलं. या देशामध्ये २५० पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. हे सगळे साखर कारखाने सहकाराचे त्याचे देशाचे नेतृत्व हर्षवर्धनकडे आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे.
पक्ष वेगळा होता पण आम्ही नेहमी सांगायचो चिंता करू नका आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे. त्यामुळे या संबंधीची कुठलीही अडचण आली तर आम्ही एकमेकांशी बोलत असायचो, त्यातून मार्ग काढत असु एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्टकरी बळीराजाच्या हिताची जपणूक करणे हेच आपले महत्त्वाचे काम आहे. हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्याला माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला. ते सोडा ते आपलं घर नाही भाऊंनी आपल्याला घर दाखवलं. भाऊंनी आयुष्यभर एकच विचार घेतला दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचा विचार. मला आनंद आहे की त्यांचं मन इथे होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूर पुरता नाही तर सबंध उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाला शक्ती देणारा अशाप्रकारचा हा निर्णय आहे.
तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टींच्या बद्दल स्पष्टता आहे की नाही? हे काही मला कळलेलं नाही. काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता बोलता म्हटले काही काम आम्हाला द्यावं. असं आहे की काही काम करणाऱ्या हर्षवर्धनची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचे असेल, लोकांचे जीवन बदलण्याचे असेल अशी कामे हर्षवर्धनकडे द्यावीत. ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जे रात्रंदिवस हिंडतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही. १४ वेळेला तुम्ही मला निवडून दिलं किंवा चौदाशे साठ वेळा इंदापूर तालुक्याने मत दिली. त्यात मला स्वतःसाठी काहीच मागायचं नाही, मला महाराष्ट्र बदलायचंय, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचे जीवनमान बदलायचे आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे हे जर करायचे असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे. ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे. राज्याचे काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे. जास्त काही अधिक मी सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्यासाठी, विजय संपादन करण्याच्या साठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सर्वांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. तो इतिहास करण्याच्या साठी हर्षवर्धन ची उपयुक्तता १०० टक्के आहे, याची मला खात्री आहे.
काही लोक मला विचारत होते की कसं होणार? काय होणार? म्हटलं काही काळजी करू नका. जावई कोणाचा आहे? कोणालाही पोरगी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालंय. संसार नीट साजरा करा तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हे बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावईचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी स्वाभिमान बाळगतो असेही पवार म्हणाले.










Leave a Reply