Nashik News: सिनर्जी राष्ट्रीय परीषदेतून सर्वसमावेशक उपचारांवर चर्चा
द असोसिएशन ऑफ शलाकीच्या राज्य शाखेच्या वतीने आयोजन
Pckhabar- द असोसिएशन ऑफ शलाकी यांच्या राज्य शाखेच्या वतीने सिनर्जी २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील परीषदेचे आयोजन केले होते. या ३ दिवसांच्या परीषदेत नेत्रविकारशास्त्र, नाक-कान-घसा, दंतवैद्यकशास्त्र यांच्यातील डॉक्टरांनी सहभागी होतांना आधुनिक उपचारांची माहिती जाणून घेतली. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकीय शास्त्र यांच्यातील समन्वय साधतांना रुग्णांवर सर्वसमावेशक उपचार करण्याबाबत चर्चा घडविण्यात आली.
सिनर्जी परीषदेच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरु डॉ.मिलिंद निकुंभ, प्रमुख पाहुणे म्हणून एस.एम.बी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य व आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ.प्रदीप भाबड यांच्यासमवेत द असोसिएशन ऑफ शालाकीचे मार्गदर्शक डॉ.राजेश पवार, अध्यक्षा डॉ. सुवर्णा गोलेचा, सचिव डॉ.संदीप निमसे, महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र लाहोरे, सचिव डॉ.मयुरेश कुलकर्णी, खजिनदार डॉ.मयुर लांडे, परीषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.तुषार फिरके, सचिव डॉ.अमोल देशमुख, डॉ.बाळकृष्ण पाटील, खजिनदार डॉ. संदीप मिसाळ, डॉ. अभिजित आग्रे, डॉ.सुनील उगले, डॉ.संतोष संघवी , डॉ.विशाल रत्नपारखी, डॉ चेतन लहरे, डॉ. महेश डोळस , डॉ अनंत भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या तीन दिवसीय परीषदेसाठी ७०० सदस्य उपस्थित होते. या परीषदेत कृत्रिम नेत्रावर शालाक्य विषयाच्या 200 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण दिले गेले. याशिवाय १५० पेक्षा जास्त शोध प्रबंध सदर झाले. यामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी, प्रॅक्टिशनर्स, प्राध्यापक, डॉक्टर यांनी हे संशोधन सादर केले.
यासोबत सायंटिफिक सत्रांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. हॉटेल रॅडिसन्स ब्लू येथे झालेल्या या परीषदेमध्ये एका सभागृहात नेत्रविकार व त्यावरील उपचार, आधुनिक उपलब्ध तंत्रज्ञान, भविष्यातील संभाव्य आजार, परदेशातील संशोधन, अर्वाचिन शास्त्र, आयुर्वेदात काय उपाययोजना आहेत, याबाबत मंथन घडविले. अन्य सभागृहात नाक-कान-घसा तर तिसऱ्या सभागृहात दंतवैद्यक शास्त्रविषयक चर्चा घडविण्यात आली.
या परीषदेनिमित्त डोळे आणि कान-नाक-घसा यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय येथे पार पाडण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचे प्रात्येक्षिके परीषदाचे ठिकाण असलेल्या रेडिसन्स ब्लू येथे दाखविण्यात आले.
समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलकुरु डॉ. मिलिंद निकुंभ म्हणाले, आजच्या जगात मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजारांचा गंभीर परीणाम डोळ्यांचा पडद्यामागे परीणाम होतो आहे. वेगवेगळ्या व्याधींवर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र यांच्या योग्य समन्वयातून सर्वसमावेशक उपचार करणे शक्य आहे. यामुळे रुग्णांना सर्वोत्तम उपचार पुरविण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आहार-विहाराचे महत्व त्यांनी विशद केले.










Leave a Reply