Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे बालचमू रमले विज्ञान प्रदर्शनात

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे बालचमू रमले विज्ञान प्रदर्शनात
विज्ञान प्रदर्शनात २९ प्रयोगांचा समावेश
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक छोटे छोटे प्रयोग पाहण्यात बालचमू रंगून गेले.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहून लहानग्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी व्हावी म्हणून पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी आपल्या सर्जनशीलतेतून हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या विज्ञान प्रदर्शनात जवळजवळ २९ प्रयोगांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये आपली पंचेंद्रिये, पाण्याचे प्रकार, अन्न, फळे, भाज्या, वनस्पती, सूर्यप्रकाश, फुलपाखरांचे जीवनचक्र, रंग, कीटक, घरांचे प्रकार, इंद्रधनुष्य तसेच सौरमंडळ या सर्व विषयांचा समावेश करुन अतिशय कल्पकतेने या विज्ञान प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली होती.

पालकांना हे प्रदर्शन विशेष भावले व त्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचे मनापासून कौतुक केले. लहान मुलांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी अतिशय सुंदर व सोपे प्रयोग शिक्षकांनी आपल्या कृतिशील उपक्रमातून सादर केले, अशा भावना यावेळी पालकांनी व्यक्त केल्या. आपल्या पालकांसमवेत आलेल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हे प्रयोग पाहताना खूप जिज्ञासा दिसून आली. लहानग्यांनी देखील हे सर्व प्रयोग आपल्या शिक्षकांकडून समजून घेतले. या लहान वयापासूनच या कोवळ्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज अंकुरण होत असते. या विज्ञान प्रदर्शनास पालकांनी उत्तम प्रतिसाद देत प्रयोग पाहण्यास गर्दी केली होती.

यावेळी श्री दादा महाराज नाटेकर विद्यालय चिखलीच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली नरवडे व जिल्हा परिषद शाळा, माळवाडी, देहूचे मुख्याध्यापक श्री विवेक नरवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सहशिक्षिका मनिषा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सुबलक्ष्मी पाठक तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या अथक परिश्रमाने हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *