Dehu News : एक रक्षाबंधन असेही..!
Pc khabar – संत तुकाराम विद्यालय देहूच्या इयत्ता दहावी सन २००२ – २००३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून “समाजाचं देणं” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो त्या अंतर्गत रक्षाबंधन सणानिमित्त श्री अहिल्यादेवी कन्या छात्रालय, देहू येथे राहणाऱ्या गरजू मुलींच्यासाठी किचनमध्ये अन्न शिजवण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी भांड्यांचा सेट, व या मुलींना मासिकपाळीत वापरण्यासाठी वर्षभर पुरतील इतके सॅनिटरी नॅपकिन भेट देऊन रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.
किशोरी अवस्थेत मुलींच्या शरीरामध्ये ऍनिमिया हा लाल रक्तपेशींच्या कमतरतेचा आजार प्रामुख्याने आढळतो, ज्यावर किशोरवयातच योग्य उपचार मिळाले तर स्त्री निरोगी बनून भविष्यात तिचे मातृत्व सुरक्षित राहू शकते. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी भांड्यात अन्न शिजवून खाल्ल्यास रक्ताचे योग्य प्रमाण शरीरात राखले जाते. त्याचप्रमाणे या वयात मासिक पाळी देखिल सुरू होत असल्याने मासिक पाळीतील स्वच्छता तसेच योग्य काळजी घेतल्यास स्त्रीचे आरोग्य सुधारू शकते. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना पोषण विषयक नेहमी दुय्यमस्थान मिळते म्हणून रक्षाबंधन सारख्या सणाच्या निमित्ताने आपल्या भगिनींच्या या आरोग्य समस्यांचा जागर व्हावा तसेच त्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी त्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. आपल्या घरातील स्त्री निरोगी राहिली तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते परिणामी निरोगी राष्ट्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्षाबंधनसारख्या सणाला इतर गोष्टींची भेट देण्याऐवजी आपल्या बहिणीच्या आरोग्याला मदत करणारी भेट दिल्यास त्यातून एक चांगला संदेश जाऊ शकतो. यावेळी “समाजाचं देणं” हा उपक्रम राबविणारे रेहमान सय्यद, अनिल ताठे, महेश काळोखे, संतोष गळवे, गणेश झेंडे, तुषार विधाटे, ऍड. निलेश टिळेकर, राहुल ठाकूर, सुशांत गायकवाड, श्रीराम शिंदे, विशाल उंबरदंड, सोमनाथ बोत्रे, डॉ. अहेफाज मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलींना डॉ. मुलाणी यांनी ऍनिमिया या आजारावर उपस्थित मुलींना मार्गदर्शन केले, आभार अहिल्यादेवी छात्रालय संस्था प्रतिनिधी वंदनाताई धगाटे यांनी मानले.
Dehu News : एक रक्षाबंधन असेही..!










Leave a Reply