Pune News : पतंगाची भरारी, प्रेरणादायी, वास्तव, कादंबरी – डॉ. सदानंद मोर
Pckhabar- ”पतंगाची भरारी, ही प्रेरणादायी वास्तववादी कादंबरी आहे. आपण आपले कर्म चांगले केले तर हे यश मिळतच राहते. अशा परिस्थितीला सामोरे जाऊन जीवनाची यशस्वी वाट चालता येते. एकमेकाला सांभाळून घेऊन, साथ देऊन कुटुंब व्यवस्था बळकट करता येते, हे या कादंबरीच्या कथा प्रसंगातून शिकता येईल. कादंबरीतील वास्तव चित्रण, कथानक वाचून एक सुखद धक्का मनाला बसल्याची भावना” संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
डॉ. जयवंत अवघडे लिखित सत्य घटनेवर आधारित, पतंगाची भरारी…या कादंबरीचा प्रकाशन समारंभ नुकताच बीएमसीसी महाविद्यालयातील पद्मश्री सायरस पूनावाला सभागृहात संपन्न झाला. पतंगाची भरारी या कादंबरीचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोपती दास यांनी भूषवले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, स्नेवर्धन प्रकाशनाच्या प्रमुख डॉ. स्नेहल तावरे, कमल वायदंडे, औषध निर्माता दत्तात्रय वायदंडे उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले की, ”ग्रामीण जीवन तेथील माती, ग्रामीण संस्कृतीशी प्रामाणिकपणा दाखविणारी माणसे, सत्वपरीक्षा पाहणारी परिस्थिती, आपुलकीच्या नात्याने गुंफलेली नातीगोती यांचे वास्तव चित्रण करणारी डॉ. जयवंत अवघडे यांची पतंगाची भरारी ही कादंबरी मराठी वाचकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाते. विसापूर एक छोटेसे खेडेगाव, याच विसापूरात कमल आणि पतंग यांचा संसार सुखात सुरु होतो. चार मुले आणि एक मुलगी यांचा सांभाळ करुन जीवन जगत असताना काळाच्या ओघात पतंगाचे आकस्मिक निधन होते आणि कमलवर या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते. या दु:खाच्या डोंगराला सामोरे जाऊन परिस्थितीशी टक्कर देत मुलांना कमल यांनी निर्धाराने शिकविले. त्यांची ही संघर्षगाथा वाचकांनी मुळातून वाचली पाहिजे. पतंगाची भरारी ही चरित्रात्मक कांदबरी वाचकांना निश्चितच वाचनीय आणि प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास आहे”.
प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले, ”ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेऊन तरुणांनी नवतंत्राच्या आधारे आपले प्रगत जीवन करता येते. शेती माती आणि नाती हे ग्रामीण भागाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कष्टाच्या आधारे आपल्या जीवनाची कर्म कहाणी चांगली करता येऊ शकते. या कादंबरीतील वास्तव चित्रावरून समजते. शेवटी कर्म हेच माणसाच्या जीवनाचे खरे मर्म आहे”.
गोपती दास म्हणाले की, ”संस्कारक्षम, चांगले उच्च शिक्षण व तंत्रज्ञान घेऊन जीवनाची वाटचाल करता येते. उच्च शिक्षणाबरोबर अध्यात्माशी सांगड माणसाला घालता आली पाहिजे. आपला जीवन संघर्ष जगत असताना कौटुंबिक स्वास्थ्य आरोग्य सांभाळून शैक्षणिक व अध्यात्मिक आशावाद जोपासता आला पाहिजे. पतंगाची भरारी ही प्रेरणादायी, सत्य घटनेवर आधारित असलेली कादंबरी, समाज म्हणाला व जनमानसाला प्रेरणादायी आहे”.
कमल वायदंडे म्हणाल्या, ”मुले लहान असतानाच पती पतंग यांचे निधन झाले. त्यामुळे मुलांची माझ्यावर जबाबदारी आली. मजुरी करुन मुलांना शिकविले. एक मुलाला आयटीआय, दोघांना अभियंता तर एकाला फार्मासिस्ट केले. माझ्या मुलांनी अभ्यासाच्या जोरावर नाव कमविले आहे. नातू उच्चशिक्षण घेण्यासाठी एमएस पदवी घेण्यासाठी ‘फॉरन’ला गेला आहे. पंतगांची भरारी जशी उंच जाते, तशी शिक्षणामुळे उंच भरारी जाते”. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. स्नेहल तावरे यांनी आपल्या सुंदर व मार्मिक शब्दांनी केले. कार्यक्रमास विसापूर गावचे पाटील वसंतदादा साळुंखे, अॅड. सोपानराव माने व इतर ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.










Leave a Reply