Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे माई बालभवन संस्थेला ५१ हजार रूपयांची मदत

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे माई बालभवन संस्थेला ५१ हजार रूपयांची मदत

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा विधायक उपक्रम

Pckhabar- दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक – विद्यार्थी – पालक यांच्या समन्वयातून दिवाळी निमित्त दि. ४ व ५ ऑक्टोबर रोजी अभंग दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिवाळी मेळ्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, मनोरंजनात्मक खेळ, दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, किल्ल्यांसाठी मातीची चित्रे, मेहेंदी अशा वेगवेगळ्या स्टाॅल्सचा समावेश करण्यात आला होता. दोन दिवस चालणाऱ्या या दिवाळी मेळ्यामध्ये आवाहन केल्याप्रमाणे भरभरून प्रतिसाद देत अधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी पालक प्रयत्नशील राहिले. याच नफ्यामध्ये संस्थेकडून अधिक रकमेची भर घालत आज विद्यार्थ्यांच्या समक्ष ५१,०००/- रुपयांचा धनादेश माई बालभवन या संस्थेला मदतनिधी म्हणून देण्यात आला. अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उपप्राचार्या सौ. शैलजा स्वामी, प्राथमिक विभागातील शिक्षकवर्ग व इयत्ता चौथी व पाचवीतील विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते हा धनादेश माई बालभवन संस्थेचे प्रमुख मधुकरदादा इंगळे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी माई बालभवन मधील विद्यार्थिनी प्राची गुप्ता हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संस्थेतील मुली अंध असूनही खेळांमध्ये प्राविण्य मिळवत आहेत तसेच तुम्हीसुद्धा खेळ, अभ्यास, जे आवडेल ते प्रयत्नपूर्वक करुन उज्वल यश संपादन करा असे प्राचीताई बोलताना म्हणाल्या. मधुकरदादा इंगळे यांनी दिलेल्या मदतनिधीचा आनंदाने स्वीकार करत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. हा मदतनिधी योग्य ठिकाणी वापरला जाईल याची ग्वाही देत मधुकरदादांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील कंद व सचिव प्रा. विकास कंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. वृषाली आढाव यांनी केले.