Chinchwad News : चिंचवड मतदारसंघात उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणूक निरिक्षकांची बैठक संपन्न

Chinchwad News : चिंचवड मतदारसंघात उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणूक निरिक्षकांची बैठक संपन्न

Pckhabar- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण आणि निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमवेत निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय थेरगांव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख, चिंचवड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी आदी उपस्थित होते.

 

श्री.ढोले यांनी या बैठकीत निवडणूक विषयक प्रक्रिया आणि उमेदवारांनी करावयाच्या आवश्यक बाबींची माहिती दिली. उमेदवाराने ठेवायच्या दैनंदिन खर्चाच्या पद्धती, स्ट्रॉंग रूमची तयारी, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन इत्यादी विविध विषयांची त्यांनी माहिती दिली. ईव्हीएम यंत्र स्थलांतरीत करताना तेथे उमेदवारांना उपस्थित राहता येईल. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन ही संवेदनशील बाब असून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे त्यादृष्टीने तंतोतंत पालन केले जाईल. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापनाची सर्व प्रक्रिया उमेदवारांना पूर्व सूचना देवूनच केली जाईल. मतदान यंत्राची सरमिसळ करताना उमेदवारांना उपस्थित राहता येईल, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यासाठी सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने आणि कायदा व सुव्यवस्था राखत पूर्ण करण्यात येईल. उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खर्चाची मर्यादा आणि त्याचे दरपत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले असून त्याप्रमाणे उमेदवाराने स्वतंत्र प्रतिनिधी नेमून दैनंदिन अहवाल निवडणूक खर्च कक्षाकडे सादर करावा. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष देण्यात आले असून कोणतीही अडचण आल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. ढोले यांनी यावेळी केले.

यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात येऊन त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली.
०००