शालेय साहित्य खरेदीचा घाट राष्ट्रवादीने उधळवून लावला, प्रशासनाकडून विषय मागे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेने जुन्याच आदेशाने तब्बल अडीच कोटी रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचा घातलेला घाट स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी उधळून लावला. कलाटे यांनी जोरदार आक्षेप घेत चुकीचा कारभार करणाऱ्या प्रशासनाला धारेवर धरल्याने अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘दिलगिरी’ व्यक्त करत ‘पुर्नपत्ययी’ आदेशान्वयाचे शालेय साहित्य खरेदीचे तब्बल 2 कोटी 43 लाख रुपयांचे विषय मागे घेतले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज गुरुवारच्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवर पुरवठादारांकडून मागील आदेशान्वये चित्रकला, प्रयोग, नकाशा वही, विविध अभ्यासपुरक पुस्तके 1 कोटी 11 लाख 80 हजार 715 आणि 1 कोटी 31 लाख 41 हजार 710 रुपयांच्या वह्या असे 2 कोटी 43 लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव होता. त्याला राष्ट्रवादीचे सदस्य मयूर कलाटे यांनी जोरदार आक्षेप घेतला.
कोरोनामुळे पालिकेच्या शाळा बंद आहेत. असे असताना जुन्याच पुरवठादारांकडून आणि जुन्याच दराने, आदेशान्वये शालेय साहित्य खरेदी कशा आणि कोणासाठी, प्रशासनाने नियमबाह्यपद्धतीने विषय स्थायी समोर आणला आहे. मुख्य लेखापरीक्षकांचे आक्षेप असताना ते विचारात न घेता कोणत्या अधिकाराने विषयास आयुक्तांची मान्यता घेतली? आयुक्तांनी कोणाच्या दबावाखाली या विषयाला मान्यता दिली? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत कलाटे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले.
अखेरीस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘दिलगिरी’ व्यक्त करत ‘पुर्नपत्ययी’ आदेशान्वयाचे शालेय साहित्य खरेदीचे तब्बल 2 कोटी 43 लाख रुपयांचे विषय मागे घेतले. राष्ट्रवादीचे सदस्य मयूर कलाटे म्हणाले, प्रशासन कोणाच्या सांगण्यावरुन चुकीचे विषय आणत आहे. यावरुन प्रशासन कोणाला पाठिशी घालत आहे. कुंपनच शेण खात असल्याचा आरोप त्यांनी केला.










Leave a Reply