Dehu News : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Dehu News : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अर्थतज्ज्ञ डॉ.अभय टिळक यांची प्रमुख उपस्थिती

Pckhabar- देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त कुटुंब आणि समाज यांना जोडणारा सेतू म्हणजे शाळा असे मत प्रमुख पाहुणे, अर्थतज्ज्ञ डॉ.अभय टिळक यांनी यावेळी व्यक्त केले.

आजकाल कुटुंबे लहान झाली, आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर असल्यामुळे मुलांनी अनुकरण करावे असे त्यांच्यासमोर काहीही नसते म्हणूनच मुलांना वेळ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले. एक सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयोगशील कार्य अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मार्फत चालविले जाते, याचे त्यांनी कौतुक केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे ध्वजावंदन समारंभ संत साहित्याचे अभ्यासक, अर्थतज्ञ, विचारवंत डॉ. अभय टिळक सर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सृजन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. कविता अय्यर, शिक्षकवृंद व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट करत शिस्तीचे प्रदर्शन केले. इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी झेंडागीत सादर केले. तसेच दुसरीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर वंदे मातरम् आणि ‘जय हो’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. इ.तिसरीतील कु. गाथा चरपे हिने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरीराचा व मनाचाही समतोल साधत इ. पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी स्केटिंग व जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिके व पिरॅमिड सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. वर्षभर शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. दिवाळी मेळा मध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या पालकांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. प्राचार्या डॉ.कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका सौ.मिनल धुमाळ व सौ. वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ.सुरेखा काटोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *