Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

जीवन आणि खेळ यांची सांगड घालत नेहमी जिंकण्याच्याच हेतूने नव्हे तर सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणे हा खेळाचा अविभाज्य भाग असतो असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवमल्हार शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यवान बालवाडकर यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी इ. तिसरी व चौथीतील सर्व विभागातील मुलांनी शिस्तीचे उत्तम प्रदर्शन करत संचलन (मार्च पास्ट) केले. विद्यार्थ्यांनी यावेळी क्रीडा शपथ घेऊन प्रामाणिक प्रयत्नांची शिकस्त केली. अग्नि, जल, पृथ्वी आणि वायू असे विद्यार्थ्यांचे विभाग (हाऊस) करण्यात आले होते. गेली पंधरा दिवस विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन निवडक स्पर्धकांची आज अंतिम फेरी घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये इ. पहिली ते चौथीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित पालक प्रतिनिधी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षक यांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकंदरीत सर्व खेळांमध्ये जल विभागाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट विभागाचे बक्षीस पटकावले. तसेच सर्व मुलींमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस इ. चौथीतील कु. दुर्वा शिवाजी काळुंके हिने मिळविले तर सर्व मुलांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस इ. तिसरीतील कु. आरव निलेश शिरसाट याने मिळविले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका सौ. प्राची पोटावळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. मिनल धुमाळ मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सुबलक्ष्मी पाठक मॅडम तर प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. शैलजा स्वामी मॅडम उपस्थित होत्या.










Leave a Reply