Pckhabar- कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकर माजविला आहे. या कोरोनाचा विविध सार्वजनिक उत्सव, सण, मिरवणूकांमधून निनादणार्या ढोल-लेझीम पथकांनाही जबर आर्थिक फटका बसला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ही ढोल-ताशाचा दणदणाट अनुभवता येणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ’कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’, असे आवाहन राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यांच्या पदाधिकार्यांना केले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री गणरायाचे आगमन आणि विसर्जन सोहळ्याच्या वेळी दिसणार्या भव्य मिरवणूका आणि त्याला ढोल-ताशा, लेझीम पथकांची मिळणारी साथ यंदा दिसणार नाही. कोरोनाचा ढोल-ताशा पथकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे पुण्या-मुंबईसह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मावळ, खेड, जुन्नर आदी भागातील सार्वजनिक गणपती मंडळे यंदा साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
कोरोनाचा पिंपरी-चिंचवडमधील आयटी कंपन्या, लघु-मध्यम उद्योग, मोठ्या इंडस्ट्रिज, लहान-मोठे वर्कशॉप, तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे अनेक नोकरदार, व्यावसायिक यांना त्याची मोठी झळ बसली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात ढोल-ताशा, तसेच लेझीम पथकांना फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. एकीकडे लॉकडाऊनपासून कोरोनामुळे औद्योगिकनगरीतील कामगारांचा, कष्टकर्यांचा रोजगार बुडाला असतांना आता गणेशोत्सवात देखिल ढोल-ताशा पथकांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
या ढोल-ताशा पथकांना गणपती काळामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. हे ढोल-ताशा, लेझीम पथके दोन तास वाजवण्यासाठी किमान 15 ते 20 हजार रूपये बिदागी घेत असत. त्यातून प्रत्येक ढोल-ताशा, लेझीम पथकाची दहा दिवसांमध्ये लाखो रूपये कमाई होत असे. मात्र, कोरोनामुळे या कमाईला आता मुकावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, मंचर, लोणावळा, मुळशी, जुन्नर आदी भागात ढोल-ताशा पथके मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या विशिष्ठ वाजवण्याच्या पद्धतीमुळे त्यांना ’पुणेरी ढोल’, असेही म्हणतात.
याबाबत चिंचवड , कृष्णानगर येथील शंभूराजे ढोल ताशा पथकाचे महेश घोगरे म्हणाले, ’ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुमारे 60 ते 70 ढोल-ताशा पथके आहेत. प्रत्येक पथकामध्ये 70-75 ते 250 मुला-मुलींचा सहभाग असतो. या पथकांकडून दरवर्षी किमान 5-7 लाख ते कमाल 10-12 लखांची कमाई केली जाते. त्यामध्ये प्रवास खर्च, अन्य खर्चाचाही समावेश असतो. मात्र, ढोल-ताशा पथक म्हणजे केवळ वादन, पैसे कमविणे हा उद्देश नाही. त्यामध्ये तरूणाईच्या भावना आहेत. एकप्रकारचा उत्साह असतो.’
निखिल काटे म्हणाले की, ‘गणेशोत्सव काळात इतर राज्यातूनही ढोल ताशा पथकांना मागणी असते. मात्र,
लाॅकडाऊनमुळे ढोल-ताशा पथकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. तसेच शहरातील अनेक पथके वादनाबरोबरच नेत्रदान, रक्तदान, वृक्षारोपण, वंचितांना मदत, गरजू, गरीब विद्यार्थ्यांंना शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप, व्यसनमुक्ती आदी कार्य देखील करत असतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात हा उत्साह दिसणार नाही.’







Leave a Reply