शहरात 19 दिवसात तब्बल 384 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, आजपर्यंत 719 जणांचा कोरोनाने घेतला बळी

शहरात 19 दिवसात तब्बल 384 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, आजपर्यंत 719 जणांचा कोरोनाने घेतला बळी

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला  20 हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. बुधवारी एकाचदिवशी तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 19 ऑगस्ट या 19 दिवसात शहरातील तब्बल 384 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील कोरोना बळींची संख्या 719 वर पोहोचली आहे. वाढते मृत्यू, जेष्ठांसह युवकांचाही मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे मृत्यू रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

शहरातील रुग्णसंख्येत जुलै महिन्यात झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पंधरवाड्यात देखील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील चार पाच दिवसांपासून हजाराच्या आतमध्ये नवीन रुग्ण सापडत आहेत. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ स्थिर होऊन कमी होईल असा प्रशासनाचा कयास आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 38 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. तर, 25 हजार 399 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला  होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मे अखेरपर्यंत केवळ 8 जणांचा मृत्यू झाला होता. जूनअखेर पर्यंत शहरातील कोरोना बळींची संख्या 77 झाली होती. जुलै महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही प्रचंड वाढली आहे. जुलै महिन्यात तब्बल 258 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, एकूण मृत्यू संख्या 335 वर पोहोचली होती. कालपर्यंत शहरातील तब्बल 719 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहिला. त्यासोबतच मृत्यूच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. 1 ते 19 ऑगस्ट केवळ 19 दिवसात तब्बल 384 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णसंख्या वाढली असल्याने मृत्यूची टक्केवारी दीड ते पावणेदोन टक्क्यांपर्यंतच कमी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र मृत्यू संख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णवाढल्यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचा पालिकेचा दावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *