Dehu News : अभंग दिवाळी मेळाव्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनी लूटला मनसोक्त आनंद

Dehu News : अभंग दिवाळी मेळाव्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनी लूटला मनसोक्त आनंद

सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा उपक्रम

Pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ व १६ ऑक्टोबर असे दोन दिवस अभंग दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः रंगविलेल्या पणत्या, शिक्षकांनी बनविलेले आकाशकंदील, तोरण, सुगंधित उटणे, अगरबत्ती किल्ल्यांसाठी चित्रे इ साहित्यांची आपापल्या पाल्यांसह पालकांनी खरेदी करीत या मेळाव्याला भरघोस प्रतिसाद दिला. टाकाऊतून टिकाऊ या उपक्रमांतर्गत पालक व विद्यार्थी यांच्या कल्पकतेतून सुंदर शोभेच्या वस्तूंचे ही प्रदर्शन भरविण्यात आले होते.

पालकांच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील विविध चविष्ठ खाद्यपदार्थांचे दोन दिवस एकूण ४५ दालन लावण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील खास पारंपारिक मासवडी, कोथिंबीर व आळूवडी, पुरणपोळी, थालीपीठ, ऊसाचा रस, वडापाव, मिसळ पाव, गुळपोळी, कांदाभजी, झुणका भाकरी आदि पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. मुलांच्या मनोरंजनासाठी मिकी माऊस, जंपिंग जॅक, मेहंदी व टॅटू यासोबतच शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेले खेळ पालकांच्या आकर्षणाचा विषय ठरले. अभंग दिवाळी मेळ्यातून जमा झालेल्या रक्कमेत भर घालीत सृजन फाऊंडेशनच्यावतीने रू.५१०००/- चा धनादेश वंचित महिला व मुलांसाठी काम करणाऱ्या अहमदनगरच्या स्नेहालय परीवाराला प्राचार्या व शिक्षिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपत मंगळवार, दि.१८ ऑक्टोबर रोजी मदतनिधी म्हणून सुपूर्त केला.

तसेच महिलांसाठी दिवाळीची भेट म्हणून माहेरची साडी या अंतर्गत पालक व शाळेच्या शिक्षिकांकडून जमा करण्यात आलेल्या १५० साड्या स्नेहालय परीवाराचे सक्रिय सदस्य श्री. किरीटी शामकांत मोरे यांसकडे सुपूर्त करण्यात आल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.आगाव सर, जेष्ठ समाजसेवक अनिल धर्माधिकारी, दत्तात्रय अत्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, वृत्तनिवेदिका स्वाती गोडसे, माजी सरपंच मधुकर कंद, वसंतराव झेंडे, आदि मान्यवर उपस्थित होते. दातृत्वाचे संस्कार लहान वयापासूनच रूजवावेत व निष्ठापूर्वक कार्य करीत असलेल्या आदर्शवत अशा ‘स्नेहालय परिवाराला’ मदत निधीच्या माध्यमातून सहकार्य व्हावे या हेतूने पालकांच्या सहकार्याने अभंग दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले अशी भावना प्राचार्या डॉ.कविता अय्यर व सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी व्यक्त केली. पर्यवेक्षिका सौ. शैलजा स्वामी मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर सेवक यांनी या दिवाळी मेळाच्या आयोजनात विशेष परीश्रम घेतले. पालकांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *