Bhoom News : भूम, परंडा, वाशी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या
माजी आमदार राहुल मोटे यांची आग्रही मागणी
Pckhabar- भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यात दररोजच्या संततधार अतिवृष्टीमुळे सर्व गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणांच्या अगोदरच बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने कोणतीही विलंब न लावता भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी, आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांनी केली आहे.

याबाबत माजी आमदार राहुल मोटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मोटे आपल्या पोस्टरमध्ये म्हणतात, भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यात दररोजच्या संततधार अतिवृष्टीमुळे सर्व गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसामुळे प्रामुख्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून खरिपातील इतर पिकांबरोबरच फळबागा, फुलबागा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. याशिवाय काही नागरिकांची राहती घरेही या पावसात पडली आहेत. सोबत शेतीपूरक व्यवसायांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी घाटनांदुर ता. भूम येथील एक महिला शेतकरी अंगावर वीज कोसळून दुर्दैवी रित्या मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी स्वतः शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही माजी आमदार राहुल मोटे यांनी म्हटले आहे.










Leave a Reply