तोंडाचा कर्करोग ! समज आणि गैरसमज : वाचा दंतरोगतज्ञ डॉ. अमित नेमाणे यांचा माहितीपुर्ण लेख
Pckhabar- परवा परवा ओपीडीमध्ये बसलो होतो तसे ओपिडीमध्ये रुग्णांची चहलपहल फारच असते आणि तोंडाचा कर्करोग ओळखण्यात विशेष प्राविण्य असे माझ्या शिक्षणाचे स्वरूप असल्याने विशेषतः तोंडाचा आजार असणारे लोक रुग्ण म्हणून माझ्या ओपीडीमध्ये जास्त येतात. किडलेले दात , सुजलेल्या हिरड्या, अडकलेली अक्कलदाढ , न उघडणारे तोंड (अर्थात तंबाखू किंवा तत्सम पदार्थ खाऊन )अशा प्रकारच्या व्याधी असलेले रुग्ण अनेक आहेत. परंतु परवाचा प्रसंग हा बऱ्यापैकी विचार करायला लावून गेला.
घडले असे की साधारणतः एक चाळीस वर्षांचे सद्गृहस्थ ओपीडीमध्ये आले, नेहमीप्रमाणे बोला काय त्रास आहे असे मी उद्गारले, तोंड अगदीच उघडायचे बंद झाले आहे, हो डॉक्टर साहेब तो इसम शक्य तेवढा दुःखीकष्टी चेहरा करून उत्तरला…. त्यास मी प्रतिप्रश्न ठेवला आणि काही त्रास ?खाताना तिखट लागते का ?अति आग होते का तोंडाची ?…”अगदी बरोबर सर !”फार जास्त होते ! “त्याने उत्तर दिले मी त्याचे तोंडातून निरखून बघितले आणि बर्यापैकी रोगाच्या निदानाच्या जवळ पोहोचलो ,तोंडाचा कर्करोग !!”लक्षणे तोंडाच्या कर्करोगाची आहेत” !मी क्षणाचाही विलंब न लावता त्यास सांगितले काय ….तंबाखू खाता? प्रश्न विचारणे भाग म्हणून विचारला अन्यथा त्याचे तोंड बघून तंबाखूचे त्याच्या द्वारे होणारे अतिसेवन ओळखण्यासाठी विशेष प्राविण्य असण्याची गरज नव्हती…… “गेली वीस वर्षे !दिवसातून पंधरा वेळा तरी होत असेल !”तो अभिमानाच्या स्वरातच म्हणाला …..नको त्या गोष्टीवर असलेला त्याचा अभिमान मला खटकला ! “बर काय काम करता साहेब ?” -मि , “पोलिसात आहे “-तो उद्गारला !!कोण जाणे परंतु मला त्याची एक विक्षिप्त दया आली .मी -“आहो एवढी तंबाखू खाल्लीत की आता तोंडाच्या कॅन्सरच्या अगदी जवळ येऊन पोचला तुम्ही !” मी कळवळीने बोललो माझ्या मनाला एक प्रचंड अशांतता चाटून गेली .पुढे त्या सद् गृहस्थास तंबाखू सोडण्यासाठी सांगताना माझा कंठ दाटून आला …त्यानंतर त्या इसमास पुढील तपासण्या करण्याकरिता पाठवून दिले आणि तात्काळ मी विचारचक्रात बुडालो…..
दर दिवशी अनेक रुग्ण येतात , ज्याच्या तोंडात तंबाखू , बिडी, सिगारेट , सुपारी …इ अशा गोष्टींमुळे कर्करोगाचे बदल दिसतात. काही रुग्ण गंभीरपणे घेतात तर काही धीर सोडतात, तर काही निगरगट्ट तंबाखू लाच आपलेसे करतात आणि काही रुग्णांचे ऑपरेशन्स होतात. अनेक रुग्ण बऱ्याच अश्या कालावधीसाठी बरे होतात तर बरेच रुग्ण मृत्यूला साद घालतात .
“मृत्यू चा रचलेला सापळा म्हणजेच तोंडाचा कर्करोग “असे म्हणावेसे वाटते !भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये दरवर्षी अनेक रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे शिकार होतात ,”सिगारेट पिल्याने तोंडाचा कर्करोग होऊ शकतो “असे धडधडीत सिगरेटच्या पाकिटावर ती लिहिलेले असूनही लोक त्याच्या विळख्यात कसे सापडतात , त्याच्या मागे फार मोठा अभ्यास आहे. समाजातील उच्चभ्रू लोक प्रेस्टिज म्हणजेच मान सन्मान म्हणून सिगरेटला आपलेसे करत असतील तर मध्यमवर्गीय टेन्शन, डोक्याचा ताण कमी करण्यासाठी या नशेच्या आहारी जात असतील तर गरीब वर्ग निष्काळजीपणा तंबाखूच्या विळख्यात फसतो. तरुण वर्ग फुशारकी म्हणून सिगरेटचा वापर करतो तर वयस्कर वर्ग शरीराला लागलेली सवय म्हणून याच्याजवळ जातो.
थोडक्यात काय तर समाजातल्या प्रत्येक वर्गाने आपापल्या सोयीने तंबाखूच्या व्यसनाला गळ घातली आहे.तोंडाचा कर्करोग होण्यापूर्वी तोंडात काही बदल होतात त्याला आम्ही प्रिकॅन्सर कंडिशन असे संबोधतो म्हणजे साधारणतः तोंड उघडे टप्प्याटप्प्याने बंद होते ,तोंडात अल्सर येणे, खाताना अन्नपदार्थ अति तिखट लागणे , तोंडात लाल की सफेद जर दिसणे अशा प्रकारची काही लक्षणे आढळतात. आई .जे .ओ .सी . मध्ये नमूद केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये 54. 41 टक्के लोक तंबाखू आणि तत्सम पदार्थांचे व्यसन करतात. दरवर्षी त्यातील 18 टक्के लोक मृत्यूच्या जाळ्यात हमखास सापडतात. जर या व्यसनाला आळा घातला नाही तर तोंडाचा कर्करोग जागतिक महामारी चे स्वरूप धारण करण्यास विलंब लागणार नाही. कर्करोगाशी सामना करणाऱ्या अनेक रुग्णांना एनजीओ , संस्था आर्थिक , मानसिक पाठबळ देतात. परंतु त्याच्यातून रुग्णांचे प्रमाण कमी होऊ शकत नाही. दररोज कर्करोगाचे रोगी पाहून डॉक्टरांच्या भावनादेखील बोथट झाल्या सारखे जाणवते “रोजचे मडे त्याला कोण रडे “हि म्हण डॉक्टरांच्या बाबतीत भाव खाऊन जाते. परंतु त्याने तोंडाच्या कर्करोगासारख्या विषयाची गंभीरता तसूभर देखील कमी होत नाही.
यासाठी आपणच स्वतःहून पुढे काहीतरी करावे असे मनाशी ठाम बांधून हा लेख लिहावयास घेतला आणि ठामपणे शिबिरे घेण्यामध्ये आणि कर्करोगावरती हल्लाबोल करूयात असे ठरविले …अचानक “डॉक्टर साहेब ,डॉक्टर साहेब!” म्हणून एका रुग्णाने हाक मारली आणि हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये असल्याची जाणीव झाली आणि एका नवीन निर्धाराने नवीन पेशंट तपासायला चालू केले.
(टिप- वरील लेख डॉ.अमित नेमाणे यांनी लिहिला असून लेखक तोंडाचा कर्करोग आणि दंतरोग या विषयातील तज्ञ आहेत.)










Leave a Reply