Chinchwad News : घाणेरड्या पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या लावणीवर नाचायची बंदी घालण्याची गरज : लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर – काळे
पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा बारावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न
Pckhabar- आज विक्षिप्तपणे लावणी सादर केली जात आहे. त्यामुळे अशा लावणीला प्रतिसाद न देता खऱ्या अर्थाने सादर केल्या जाणाऱ्या लावणीला प्रतिसाद द्या. घाणेरड्या पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या लावणीवर नाचायची बंदी घालण्याची गरज आहे. कारण अशा पद्धतीने लावणी सादर केली जात असल्यामुळे लावणी बदनाम होत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर – काळे यांनी खंत व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचा बारावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. कार्यक्रमात यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर – काळे यांना, कलाभूषण पुरस्कार अभिनेते संतोष चव्हाण यांना, कलारत्न पुरस्कार ज्येष्ठ तबला व ढोलकी सम्राट राजू जावळकर यांना, कलादर्पण पुरस्कार अभिनेते नृत्य दिग्दर्शक अर्जुन जाधव यांना, समाजभूषण पुरस्कार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना, तर समाजरत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मेघराज राजेभोसले, अभिनेत्री सुरेखा कुडची, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अनिल गुंजाळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, श्रावणी चव्हाण, पिंपरी-चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे, सचिव संजय मगर, सहसचिव महेंद्र अडसूळ, कार्याध्यक्ष चित्रसेन भवार, सहकार्याध्यक्ष अमोल पांढरे, खजिनदार राजेश डेव्हिड, सह खजिनदार सॅमसंग चंदनशिव, महिला प्रमुख हेमा कोरबरी, शिल्पा भवार, माधवी सातपुते, उपाध्यक्ष राजेश जाधव, बाळासाहेब निकाळजे, अमीर शेख, मिठू पवार, के. डी. कड, गणेश गायकवाड, अभिजीत पुजारी, देविदास साठे, दिलीप घोडे, दादा साळवे आदी उपस्थित होते.
शकुंतलाताई नगरकर – काळे पुढे बोलताना म्हणाल्या, की आम्ही लावणी सादर करताना पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत शरीर झाकलेले असायचे. आज चित्रविचित्र कपडे घालून लावणी सादर केली जाते, ही चिंतेची बाब आहे. अशा सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली नाही पाहिजे. आज लावणी जपण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खऱ्या कलाकारांना प्रेम द्या. पिंपरी चिंचवड कलाकार संघाने नव कलाकारांच्या कला लोकांच्या समोर आणण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, की केवळ अंगप्रदर्शन केले म्हणजे गाणे उत्कृष्ट झाले असे नाही, तर पूर्ण अंग झाकूनही गाण्यातील भाव उत्कृष्टपणे मांडता येतात. घाणेरडे हातवारे, पेहराव करणे गरजेचे नसते. प्रेक्षकांनी लावणीतील सौंदर्य पाहणे गरजेचे बनले आहे.
मेघराज राजेभोसले म्हणाले, की हा लोककला जपणाऱ्या लोकांचा सन्मान आहे. कलाकार एकत्र आले तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. कलाकारांनी उद्योग, व्यवसायातही आले पाहिजे. बचतीची सवय लावली पाहिजे. कलाकार संघांचे विजय उलपे यांनी संपूर्ण आयुष्य कला क्षेत्रासाठी वेचले. इथून पुढेही त्यांनी सक्रिय राहून मार्गदर्शकाची भूमिका निभावावी.
संतोष चव्हाण, सुरेखा मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, महिलांसाठी लावणी महोत्सव, नाट्यरंग, हास्य कट्टा, संगीत रजनी आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
प्रास्ताविक विजयकुमार उलपे यांनी केले. सूत्रसंचालन चित्रसेन भवार यांनी, तर आभार के. डी. कड यांनी मानले.










Leave a Reply