Pcmc Tax Department News : ५ महिन्यांत शहरात तब्बल ११ हजार २७२ नव्या मालमत्तांची नोंद
सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरात सातत्याने गृहप्रकल्प मोठ्या संख्येने वाढ होत आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मालमत्ताकर नोंदणी सतत वाढत आहे. गेल्या ५ महिन्यांत शहरात तब्बल ११ हजार २७२ नव्या मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यातून महापालिकेस दरवर्षी लाखो उत्पन्न मिळणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.
३१ मार्च २०२२ पर्यंत महापालिकेकडे एकूण ५ लाख ७१ हजार ५५२ मालमत्तांची नोंद झाली होती. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत वरील मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण नोंदविलेले ५ लाख ८२ हजार ८२४ मालमत्ता शहरात आहेत.
सर्वाधिक ३ हजार ६१ मालमत्तांची नोंद वाकड भागात झाली आहे. त्यापाठोपाठ २ हजार १४५ मालमत्ता चिखली परिसरात, ९९३ मालमत्ता मोशीत, तर ८४९ मालमत्ता थेरगाव परिसरात वाढल्या आहेत. नव्याने नोंद झालेल्या एकूण ११ हजार २७२ मालमत्तांपैकी सर्वाधिक ९ हजार ८०० मालमत्ता या निवासी आहेत. तर, ९०९ मालमत्ता बिगरनिवासी आहेत. औद्योगिक २३, मोकळ्या जमिनी ४११, मिश्र मालमत्ता ७१ आणि इतर मालमत्ता ५८ आहेत. या नव्या मालमत्तांची नोंद झाल्याने महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे.
शहरात नव्या मालमत्तांची नोंद घरबसल्या महापालिकेच्या संकेतस्थळावरून करता येत आहे. त्या सुविधेचा लाभ नागरिक घेत आहेत. नव्याने खरेदी केलेल्या मालमत्तांची तत्काळ नोंद करावी. तसेच मुदतीमध्ये कर भरून मालमत्ताधारकांनी विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.










Leave a Reply