Pimpri News : गणेश विसर्जन घाटावर सेवा सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या : आयुक्त शेखर सिंह

Pimpri News : गणेश विसर्जन घाटावर सेवा सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या : आयुक्त शेखर सिंह
Pckhabar- गणेशोत्सवाच्या दृष्टीने आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असून गणेश  विसर्जन घाटांच्या स्वच्छताविषयी सुरु असलेल्या अंतिम टप्प्यातील कामांची स्थळ पाहणी आज आयुक्त शेखर सिंह यांनी केली. गणेश मिरवणूक मार्ग तसेच विसर्जन घाटावर महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा  सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज शहरातील सर्व प्रमुख गणेश विसर्जन घाटांची  तसेच काही घाटांवर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांची पाहणी केली. तेथे महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या  सुविधांचा आढावा त्यांनी  घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावर्षी शहरात उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा होणार असून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक गणेश विसर्जनसाठी घाटावर येण्याची शक्यता आहे. शिवाय गणपतीची प्रतिष्ठापना करताना तसेच विसर्जनासाठी   निघणाऱ्या मिरवणुकांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर जय्यत तयारी करत आहे. सुरक्षा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली.  यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय खाबडे, संजय कुलकर्णी, डॉ. ज्ञानदेव जुंधारे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, उप आयुक्त  अजय चारठाणकर, रविकिरण घोडके तसेच जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक  आदी या पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी होते.

आज पाहणी करण्यात आलेल्या प्रमुख स्थळांमध्ये ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट, चिंचवडगाव थेरगाव पूल घाट, ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरी येथील सुभाषनगर झुलेलाल घाट, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड येथील विसर्जन घाट, ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वेताळ महाराज उद्यान शेजारील सांगवी घाट, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत इंद्रायणी नदीवरील मोशी घाट यांचा समावेश आहे.  तसेच इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या मोशी येथील खाणीची पाहणी देखील आयुक्त सिंह यांनी केली.

शहरात विविध ठिकाणी विसर्जन घाटांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या पाहणीवेळी संबंधित क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, विनोद जळक, विजयकुमार थोरात यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयांमधील संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी गणेश विसर्जन घाटांवर दिशा दर्शक व स्थळ दर्शक फलक लावण्यात यावे, विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांचे ठिकाणे निश्चित करून तसे फलक लावावेत. जीवरक्षकांची नेमणूक करून मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावे, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विसर्जन घाटांवर सुशोभीकरण करण्यात यावे, अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला केल्या. नागरिकांनी गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचीही काळजी घ्यावी असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी नागरिकांना केले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *