Pimpri News : नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांच्या स्थायीच्या पहिल्याच बैठकीत साडेसहा कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Pimpri News : नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांच्या स्थायीच्या पहिल्याच बैठकीत साडेसहा कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Pckhabar- महापालिका सभा,  स्थायी समिती आणि विधी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.  स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ६ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना यावेळी मान्यता देण्यात आली.  प्रशासक  शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आज पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांमध्ये कामांच्या नावात बदल तसेच तरतूद वर्गीकरणाच्या विषयांचा समावेश होता.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना  मान्यता देण्यात आली. ग प्रभागातील स्मशानभुमीमध्ये गॅस दाहिनी करीता गॅस कनेक्शन घेण्याकामी  एम. एन. जी.एल. यांना १३ लाख रुपये अदा करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.९ मधील रसरंग चौक ते म्हाडा कॉर्नर रस्ता अर्बन स्ट्रीट आराखडा करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे, याकामी १ कोटी ३१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेचे अद्ययावत प्रायमरी डाटा सेंटर कार्यान्वित ठेवण्यास तसेच याकामी एक वर्ष कालावधीकरिता ४९ लाख रुपये खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवीन थेरगाव, नवीन आकुर्डी, नवीन भोसरी, नवीन जिजामाता येथील ऑथोरायझेशन फी आणि कन्सेंट परवाना रजिस्ट्रेशन फी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला १२ लाख रुपये अदा केले जाणार आहेत.

प्रभाग क्र.१३ से.क्र.२२ निगडी येथील मिलिंदनगर तसेच  सभोवतालच्या परिसरातील पाथवे स्ट्रॉर्म वॉटर लाईन व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहे. याकामी १८ लाख खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्र.१४ मोहननगर, काळभोरनगर परिसरातील रस्त्याचे आवश्यकतेनुसार मजबुतीकरण आणि सुधारणा करून  येथे विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. याकामी ३१ लाख रुपये खर्च होणार आहे. प्रभाग क्र.८ मधील वैष्णव माता शाळेसमोरील मोकळया जागेवर उद्यान विकसित करण्यात येणार आहेत, तसेच योगा केंद्र उभारण्यात येणार असून याकामी १ कोटी ५८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.  ह प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणाऱ्या १ कोटी ३१ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

ह प्रभागामध्ये मातीचे ट्रॅक किंवा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगिक विदयुत व स्थापत्य विषयक कामे करण्याचे नियोजित असून याकामी येणाऱ्या ८४ लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *