Article By Dr. Anjali mulke : संभाल तेरी गगरी रे..!

Article By Dr. Anjali mulke : संभाल तेरी गगरी रे..!

Pckhabar- उत्सव म्हणलं की उत्साहाचं उधाण..!
आपल्या देशात विविध धर्माच्या परंपरांनी, उत्सवांनी नटलेल्या विविध संस्कृती आहेत.. सण आहेत..
सण म्हणजे आपल्या संस्कृतीचा आरसा.. आपल्या वैविध्यपूर्ण परंपरांचा वारसा..!!
तो जपायलाच हवा..
म्हणतात ना,, जो देश आपला इतिहास आणि संस्कृती जपतो, तो कधीच रसातळाला जात नाही..!

पण अशात सण म्हणजे आनंद कमी आणि दिखाव्याचे सोपस्कार जास्त झाले आहेत असं वाटत आहे….
संस्कृती जपण्यासाठी, आनंदासाठी सण उत्सव साजरे करावेत.. पण आता त्यात भपकेबाजपणा भरून राहतो आहे..

आज लिहिण्याचं निमित्त होतं, दही हंडी च्या उत्सवाच्या अतिरेकी प्रदर्शनाचं..!
मी माझ्या क्लिनिकहुन परत येताना या आठवड्यात रोज, दही हंडीच्या थरांची प्रॅक्टीस करणारे, अगदी किशोर वयापासून ते तरुण मुलं एकावर एक थर रचत प्रॅक्टीस करत असताना पाहत होते..
ना हेल्मेट, ना सुरक्षा कवच, ना कसले सेफ्टी मेजर्स..
बाजूला थाटात मंडप थाटलेला आणि त्यावर विविध पक्षांच्या नेत्यांच्या फोटोसहित, त्यांच्या नावांचे हवेत शान के साथ फडफडणारे मोठमोठे फ्लेक्स..
आणि बाजूला लावलेल्या डी जे च्या मोठमोठ्या स्पीकर वर वाजणारं दर वर्षीचं टिपिकल सलमान खानचं गाणं.. ‘चांदी की डाल पे सोने का मोर’.. किंवा अमिताभचं ‘मच गया शोर सारी नगरी रे’.. आणि त्यावर बेधुंद होऊन नाचणारी बच्चे कंपनी..!

त्यांची ही प्रॅक्टीस मी दोन क्षण थांबून आवर्जून पाहत होते..
कौतुक वाटलं, की आपल्या पोरांमध्ये हुशारी, धडाडी, कौशल्य सगळं काही आहे.. शेवटी शिवबाच्या मावळ्यांची पुढची पिढीच ती..!
पण ही सगळी हुशारी आणि कौशल्य कोणीतरी सपशेलपणे आपल्या स्वार्था साठी वापरून घेत आहे.. ते म्हणजे आजचे राजकारणी.. सर्व पक्षीय राजकारणी.. इथे कोणाचाही उद्धार मला करायचा नाही..
शिवरायांनी ह्यांच्या पूर्वजांची हीच धडाडी, कौशल्य वापरून त्यांच्याच साठी रयतेचे राज्य निर्माण केले..
पण आजची नेते मंडळी मात्र, यांना अमिषांचे तोटके गाजर देऊन त्यांना आपापल्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेत आहेत..!

यांचं वयच धडाडी दाखवण्याचं..
पण यांना याच्या उपयोगासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही..
ही धडाडी मग कसबीने हे राजकीय लोक आपल्याकडे वळवतात..!
का हो..!!?
तुमच्या राजकीय प्रतीष्ठेपायी सामान्य गरीब पोरांना मृत्यूच्या दाढेत ढकलता.. आणि वरून काही झाल्यास कळवळा दाखवत, चार कवड्यांची मदत घोषित करता..!!??
सण म्हणून केवळ दोन चार थरांचा उत्सव साजरा करता येत नाही का..!?
कशाला ही राजकीय चढाओढ असायला हवी..!?
त्यात पोरांचा जीव टांगणीला लावून, त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलून देऊन, आपला राजकीय तमाशा रंगदार रंगवता तुम्ही लोक..!?
ठाणे, मुंबई, MMRDA आणि इतरत्र महाराष्ट्रात देखील कित्येक जीव जातात दर वर्षी..!
हा मनुष्यवध नाही का..!!
ज्यांनी ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक थर रचून किंवा आणखी असे तमाशे करून आपली करमणूक मांडली आहे, त्या त्या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल का होऊ नये..!?

काय देता तुम्ही, एवढा धोका पत्करून तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तरुणांना..!?
नोकरी देता…!?
की धंदा पाण्यासाठी पैसा देता..!?
त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी, त्यांना गरिबीच्या रेषेच्या वर आणण्यासाठी काय उपाय योजता..!?
दर वर्षी ही तरुण पोरं जीव धोक्यात टाकून तुमच्या पक्षाची, तुमची मानाची, प्रतिष्ठेची दही हंडी पूर्णत्वास नेतात..
आणि वर्षभर ठेचा खात, तेच सामान्य आयुष्य जगतात.. पुन्हा पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आपला जीव तळहातावर घेऊन त्याच दरिद्री परिस्थितीत उत्साहाने हजर असतात..!

काय गरज आहे हा मृत्यूचा खेळ उत्सव म्हणून साजरा करण्याची..!?
उत्सव उत्सवासारखा करा..
दहा, अकरा थर लावण्याची गरजच काय..!?
दोन तीन थरात उत्सव होणार नाही का..!?
त्याला सण म्हणता येणारच नाही की काय..!?

आपल्या मराठीत म्हण आहे.. “आईजी च्या जीवावर बाईजी उदार…!!”
‘आईजी’ (सामान्य जनता) च्या जीवावर हे ‘बाईजी’ (राजकारणी) उदार होऊन राहिले आहेत..!
पैसा कोणाचा..??
सामान्य माणसांचा टॅक्स..
उदार मनाने वाटणार कोण..!?
जबरदस्ती आमच्या नरडी बसलेल्या सरकारातील लोक..!!
कोणत्याही पक्षाचे सरकार असो.. एकदा का सत्ता हातात आली की, पैसा आपल्याच खिशातला वाटतो यांना..!

टॅक्स भरून पैसा आम्ही सामान्य जनतेने, राज्य आणि देशाच्या विकासासाठी दिलेला असतो..!
शैक्षणिक विकास.. आरोग्य सुविधा.. पायाभूत सुविधा.. किमान मुलभूत गरजांची पूर्तता.. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागणाऱ्या योजनांचा खर्च.. शेतकरी, मजूर, वंचित, आदिवासी, गरीब, महिला, बाल इ. वर्ग यांच्या पूनुरुत्थानासाठी..
कित्येक निर्माण कार्यासाठी हा टॅक्स सामान्य जनता भरते..
ना की गरीब पोरांच्या आयुष्याचा खेळ मांडून त्यांच्या मृत्यूचा उत्सव साजरा करून त्यांना सांत्वन दाखवत त्यांना मदत वाटण्यासाठी.. ना तुमचे राजकीय प्रतिष्ठेचे चोचले पुरवण्यासाठी..!

कोणत्या एखाद्या तरी नेत्याचा मुलगा दही हंडीच्या थरातील पहिल्या थरात तरी उभा होता का आजपर्यंत..!?
ते आपले थाटात गाड्यात येऊन, उंचीवर स्टेज वर हार तुरे स्वीकारून, हा मृत्यूचा थरार असुरी आनंद घेत बघत बसतात..
थरावर थर रचत असतात.. आणि वरून ही राक्षसी वृत्तीची मंडळी, त्या गोविंदांवर पाणी टाकण्याचा मूर्खपणा करून वरून त्यांची मजा बघतात..
ते घसरले कसे पाहिजे याची तजवीज करून वरून हसतात..!!
किती हा असुरीपणा..!!
आणि कसला अपघात झाला, की , आहेच जनतेचा पैसा सरकारी खजिन्यातून काढून खोटे सांत्वन दाखवायला..!
न जाणो, अशा अपघातात मृत्यू पावलेल्या किती कुटुंबांना ही मदत मिळत असेल..!
आमचा कोरडा पुळका आणि कोरड्या घोषणा मात्र लगेच मीडिया समोर, पत्रकारांसमोर तयार असतात..!
नोकरीच्या आणि पैश्यांच्या अमिषांचा कोरडा फुफाटा मीडियासमोर उडविण्यात या प्रसिद्धी आणि सत्ता लोलुप नेत्यांना फार मोठेपणा वाटतो..!
प्रत्यक्षात मात्र कोपऱ्याचा गूळ..!!

फार क्लेशकारक आणि असुरी आहे हे..!
सणांना प्रतिष्ठा बनवू नका..
ती संस्कृती आहे.. ती परंपरा आहे..
त्याचा आनंद घ्या..
तरुणांनी आपले मौल्यवान जीव धोक्यात घालून कोणा नेत्याची प्रतिष्ठा वाढवण्याकरिता आपल्या जन्मदात्या माता पित्यांना जन्मभरासाठी दुःख देऊ नका..
आपल्या ह्या तरुण धडाडी, कौशल्य, आत्मविश्वास, हुशारीला वैयक्तिक, कौटुंबिक आणि राष्ट्रप्रगती साठी वापरा..!
सण, उत्सव आनंदासाठी असतात.. प्रतिष्ठेसाठी आणि दिखाव्यासाठी नाही..!!

दही हंडी म्हणजे नटखट श्रीकृष्णाने त्याच्या बाळगोपाळांसोबत केलेला अवखळपणा..
त्यांच्या गोड बाललीला दाखवत केलेला दंगा मस्ती..
दही हंडी म्हणजे, जात पात न मानता, श्री कृष्णाने एकाच मटकीतील, लोण्याच्या स्वरूपातील त्याच्या सवंगड्यांना वाटलेले प्रेम आणि आपुलकी..!!
पण त्याचं आज काय झालंय..!!
सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुरक्षित रहा..!!
जय श्री कृष्ण..!!
-डॉ.अंजली मुळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *