Dehugaon News : ‘ग्यानबा-तुकाराम’ च्या गजरात अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा पालखी सोहळा उत्साहात साजरा
Pckhabar- आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इ. पहिली ते चौथीतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या पांढऱ्याशुभ्र वेशात वारीमध्ये सहभागी झाले होते. वारीमध्ये एकूण सहा दिंड्या सहभागी झाल्या होत्या.

या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे’, ‘अवघाचि संसार’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘देवाचिये द्वारी’, ‘आवडे हे रुप’, ‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव’, ‘हेचि दान देगा देवा’, ‘आकल्प आयुष्य’, ‘मन हा मोगरा’ अशा विविध अभंगांचा गजर करीत पालखी सोहळा भक्तिमय केला.
इ. दुसरीतील *भावेश खोसे* याने आपल्या गोड आवाजात *’गोड तुझे नाम’* आणि *’माझे माहेर पंढरी’* या दोन अभंगरचना सादर करून वातावरणात गोडवा आणला. शाळेच्या पटांगणातून टाळांच्या नि ‘ग्यानबा- तुकाराम’ च्या गजरात ‘अभंग पालखी’ काढण्यात आली. हौशी विद्यार्थ्यांनी पावसाची तमा न बाळगता फुगडी घालून शाळेचा परिसर आनंद व भक्तिने फुलून आणला. यावेळी सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा.विकास कंद यांनी विद्यार्थ्यांना वारी विषयी संवादातून माहिती सांगितली. सर्व वारकरी झालेले विद्यार्थी यावेळी नामघोषात तल्लीन झाले होते.
पालखी शाळेच्या परीसरातून फिरुन आल्यानंतर शाळेचे शारीरिक शिक्षण संचालक श्री. अशरफ शेख व शाळेच्या सर्व बस चालकांच्या हस्ते विश्वब्रम्हांडनायक श्री पांडुरंग, विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आरती संपन्न झाली. सहशिक्षिका सौ. रोहिनी देशमुख यांनी सादर केलेल्या पसायदानाने या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. ‘अभंग पालखी’ सोहळ्यात सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर सेवक भावभक्तिने सहभागी झाले होते.










Leave a Reply